लखनऊ: भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशातील सत्ता कायम राखेल असा अंदाज आहे. टाईम्स नाऊ आणि पोलस्ट्रेटच्या ओपिनियन पोलनुसार पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल. भाजपला ४०३ पैकी २३९ ते २४५ जागा मिळू शकतील, असं सर्वेक्षण सांगतं. तर समाजवादी पक्षाला ११९ ते १२५ जागा मिळतील असा अंदाज आहे. बहुजन समाज पक्ष ३० जागांसह तिसऱ्या, तर काँग्रेस ५ ते ८ जागांसह चौथ्या क्रमांकावर असेल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते.
टाईम्स नाऊ आणि पोलस्ट्रेटनं केलेलं सर्वेक्षण खरं ठरल्यास योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होतील. याआधी उत्तर प्रदेशात कोणत्याही मुख्यमंत्र्यांना सलग दोन टर्म मिळालेल्या नाहीत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत योगींची कामगिरी चांगली झाल्याचं जनतेला वाटतं. जबरदस्तीनं केलं जाणारं धर्मांतरण रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याचे संकेत योगींनी दिले आहेत. त्याचा परिणाम सर्वेक्षणात दिसला.
कोणत्या भागात कोणत्या पक्षाला किती जागा?बुंदेलखंडमध्ये विधानसभेचे १९ मतदारसंघ आहेत. यापैकी १५ ते १७ जागांवर भाजप विजयी होईल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. सपला ० ते १, बसपला २ ते ५ जागा मिळू शकतात.
दोआबमध्ये एकूण ७१ जागा आहेत. यातील ३७ ते ४० कमळ उमलू शकतं. तर २६ ते २८ जागांवर समाजवादी पक्षाला यश मिळू शकतं. बसपला ४ ते ६, तर काँग्रेसला ० ते २ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पूर्वांचलमध्ये विधानसभेच्या ९२ जागा आहेत. त्यापैकी ४७ ते ५० जागांवर भाजपला यश मिळू शकतं. समाजवादी पक्षाला ३१ ते ३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपला ४० ते ४२ जागा मिळू शकतात. समाजवादी पक्षाला २१ ते २४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर बसपला २ ते ३ जागा मिळू शकतात.