नवी दिल्ली - यावेळची उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक ही रंगतदार होण्याची शक्यता आहे. अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत एकतर्फी वाटणारी उत्तर प्रदेशमधील विधानसभेची निवडणूक भाजपासमोर अखिलेश यादव यांच्या सपाने तगडे आव्हान उभे केल्याने चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांत काही बड्या नेत्यांसह अनेक आमदारांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला धक्का बसणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच या पक्षांतरानंतर आज प्रसिद्ध झालेल्या ओपिनियन पोलमधून उत्तर प्रदेशमधील चित्र पूर्णपणे बदलल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांत भाजपामधून झालेल्या मोठ्या प्रमाणावरील पक्षांतरानंतर आज हा सर्व्हे प्रसिद्ध झाला आहे. टाइम्स नाऊ-नवभारतच्या सर्व्हेमधून उत्तर प्रदेशात भाजपा आणि सपामध्ये अटीतटीची लढाई होण्याचे संकेत मिळत आहेत. या सर्व्हेतील आकडेवारीनुसार भाजपाला ३७.२ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला ३५.१ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांमध्ये केवळ २ टक्के मतांचा फरक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये मतांसाठी तुंबळ रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मतांच्या आकडेवारीचे जागांमध्ये रूपांतर केल्यास समोर येणाऱ्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात भाजपाला २१९ ते २४५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला १४३ ते १५४ जागा मिळू शकतात. बहुजन समाज पक्षाला ८ ते १४ जागांवर यश मिळू शकते. तर काँग्रेसलाही ८ ते १४ जागा मिळू शकतात. इतर पक्षांच्या खात्यात ० ते ३ जागा जाऊ शकतात.
या सर्व्हेनुसार पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेच्या जवळ जाण्याची शक्यता असून, आपला ५६ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ४४ जागांवर समाधान मानावे लागू शकते. भाजपा आणि अमरिंदर सिंग यांच्या आघाडीला २ जागा मिळू शकतात. तर अकाली दलाला १३ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या खात्यामध्ये २ जागा जातील. तर उत्तराखंड आणि गोवा या राज्यात भाजपा पुन्हा बहुमत मिळवू शकतो. येथे आप आणि काँग्रेस यांच्यातील मतविभागणी भाजपाच्या पथ्यावर पडू शकते.