लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने आयोजित केलेल्या व्हर्चुअर रॅलीत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली असून, यामध्ये सहभागी झालेल्या तब्बल २५०० कार्यकर्त्यांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने गौतमपल्ली एसएचओविरोधात निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत.
पाचही राज्यांचे निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही नियम घालून दिले होते. १५ जानेवारीपर्यंत रॅली, रोड शो आणि सभांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचे निर्देशही निवडणूक आयोगाने दिले होते. यामुळेच समाजवादी पक्षाच्या व्हर्चुअल रॅलीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांची गर्दी
भाजपला रामराम केल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य, धरम सिंह सैनी यांच्यासह अनेक नेत्यांनी सपामध्ये प्रवेश केला. या प्रसंगी आयोजित एका कार्यक्रमात अखिलेश यादव यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. या प्रसंगी ‘व्हर्च्युअल रॅली’मध्ये सहभागी होण्यासाठी शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने, लखनऊ पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या रॅलीला सपा प्रमुख अखिलेश यादव आणि भाजपचे माजी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी संबोधित केले.
प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन
समाजवादी पक्षाच्या कार्यालयात झालेल्या प्रचंड मेळाव्याच्या संदर्भात प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन आणि कोरोना कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गौतमपल्ली पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. लखनऊ जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, प्रथमदर्शनी, कोरोना नियमांचे उल्लंघन झाले आहे आणि तपास सुरू आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांचे पथक तेथे गेले होते.