Lok Sabha Elections 2024 Latest News : काल, म्हणजेच 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या अन् अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले. मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात आली. एकीकडे संपूर्ण देशात एक्झिट पोलची चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे अनेकांचा जीव जात होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीव्र उष्णतेमुळे निवडणूक कर्तव्यावर तैनात असलेल्या 33 कर्मचाऱ्यांसह किमान 58 लोकांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक मृत्यू उत्तर प्रदेशात झाले आहेत. तिथे मिर्झापूर आणि सोनभद्र येथे निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या 15 कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी उष्माघाताने मृत्यू झाला. मिर्झापूरचे विभागीय आयुक्त मुथुकुमारसामी बी म्हणाले की, त्यापैकी तेरा जणांमध्ये सात होमगार्ड, तीन स्वच्छता कर्मचारी आणि एक लिपिक कर्मचारी यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी सांगितले की, मृतांमध्ये होमगार्ड, स्वच्छता कर्मचारी आणि इतर मतदान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वजण भर उन्हात दिवसभर मतदान प्रक्रियेदरम्यान कर्तव्यावर होते. ड्युटीवर मरण पावलेल्यांना 15 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रिनवा यांनी सांगितले.
बिहारमध्ये 14 जणांचा मृत्यू बिहारमध्येही निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या जवानांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. येथे एका दिवसात 14 लोकांचा मृत्यू झाला. बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने (डीएमडी) जारी केलेल्या निवेदनानुसार, सर्वाधिक मृत्यू भोजपूरमध्ये झाले आहेत. तिथे निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पाच कर्मचाऱ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. यानंतर रोहतासमध्ये तीन, कैमूर आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
ओडिशात 9 अन् मध्य प्रदेशात 2 ठारओडिशातील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले की, उष्णतेशी संबंधित आजारामुळे आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 54 झाली आहे. ओडिशात शुक्रवारी उष्माघाताने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 45 होती. 54 मृत्यूंपैकी 20 पश्चिम ओडिशाच्या बोलंगीर जिल्ह्यात आणि 15 संबलपूरमध्ये झाले. ओडिशाचे विशेष मदत आयुक्त सत्यब्रत साहू यांनी सांगितले की, 15 मे पासून उष्णतेच्या लाटेमुळे 96 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातदेखील उष्णतेच्या लाटेमुळे दोन मृत्यूची नोंद झाली आहे.