उत्तर प्रदेशमध्ये सध्या सोफ्यावरुन खूप राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ३ नोव्हेंबरला इटावाच्या सैफई तालुक्यातील गीजा गावात डेंग्यूमुळे कुटुंबीय गमावलेल्या एका कुटुंबाची भेट घेण्यासाठी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव गेले होते. अखिलेश यादव यांनी गरीब कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसंच त्यांना मदतही देऊ केली. पण याचवेळी अखिलेश यादव ज्या सोफ्यावर बसले होते. त्यावरुन मोठं राजकारणच सुरू झालं आहे.
सैफई तालुक्यातील गीजा नावाच्या गावात मुकेश बाथम नावाचा व्यक्त आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मुकेश बाथम यांना पाच मुलं आहेत. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुकेश बाथम सैफई येथील बाजारपेठेत एक छोटेखानी हॉटेल चालवतात. त्यासोबतच शेती देखील करतात. मुकेश यांचा एका मुलाचं तीन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. याच मुलाचं २० ऑक्टोबर रोजी डेंग्यूमुळे निधन झालं. याची माहिती मिळाल्यानंतर अखिलेश यादव कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी बाथम यांच्या घरी पोहोचले होते.
मुकेश बाथम यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या दोन मुलांचं लग्न गेल्या चार महिन्यात झालं आहे. यात त्यांच्या एका मुलाचं डेंग्यूमुळे निधन झालं. त्यामुळे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी आले होते. ज्या सोफ्यावर अखिलेश यादव बसले होते तो सोफा मुलाच्या लग्नात ३ महिन्यांपूर्वी भेट म्हणून मिळाला होता.
मुकेश यांच्या दाव्यानुसार दुसरा सोफा ज्यावर ते स्वत:ला बसलेले फोटोत पाहायला मिळतात. तो सोफा देखील चार महिन्यांपूर्वी आपल्या दुसऱ्या मुलाच्या लग्नात भेट स्वरुपात मिळाला होता. लग्नात भेट म्हणून मिळालेले दोन्ही सोफा सेट घरातच ठेवण्यात आले होते. त्यावरच अखिलेश यादव बसले होते, असं मुकेश यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अखिलेश यादव यांनी मुकेश यांची भेट घेतल्यानंतर ट्विटवर फोटो ट्विट केला होता. यात अखिलेश यादव एका गरीब कुटुंबाच्या घरात आलिशान सोफ्यावर बसले आहेत. हा सोफा नेमका आला कुठून असा सवाल उपस्थित करत भाजपा आणि काँग्रेस नेत्यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला होता. "ज्या घराला साधं प्लास्टर केलेलं नाही त्या घरात असा आलिशान सोफा आला तरी कुठून?", असा सवाल यूथ काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी उपस्थित केला होता. दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी शहजादे जिथं जातात तिथं आपला सोफा सोबत घेऊन जातात, असा टोला लगावला होता. त्यानंतर अखिलेश यादव यांच्या सोफ्याचं राजकारण सुरू झालं होतं. पण आता खुद्द घरमालकानं याबाबतचं स्पष्टीकरण दिल्यानंतर वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.