बिहारच्या पूर्व चंपारणच्या पताही प्रदेशातील सरैय्या गोपाल ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. कारण, येथील सरपंच पदासाठी थेट पिता-पुत्रांमध्ये लढत होती. सुरेश प्रसाद सिंह यांच्या मुलानेच चक्क वडिलांविरोधातच निवडणुकीत शड्डू ठोकला होता. या निवडणुकीत सरपंचपदासाठी एकूण 7 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये, आपल्या मुलासह इतर सर्वच उमेदवारांचा पराभव करत सुरेश सिंह यांनी सरपंचपदाची खुर्ची पटकावली.
सुरेश प्रसाद सिंह हे विद्यमान सरपंच आणि निवृत्त शिक्षक आहेत. सरपंचपदी त्यांनी ही निवडणूक जिंकली असून आपला मोठा मुलगा अंशू सिंहचा पराभव केला आहे. सुरेश प्रसाद यांना एकूण 1386 मत मिळाले, तर उपविजेता ठरलेल्या उमेश प्रसाद सिंह यांना 1340 मत मिळाली. विशेष म्हणजे सुरेश सिंह यांच्या मुलाला केवळ 149 मत मिळाल्याने ते सहाव्या स्थानावर गेले.
सुरेश सिंह यांनी 2016 साली निवडणूक लढवली अन् जिंकली. शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गावाची सेवा करण्यासाठी निवडणूक लढवून सरपंचपद मिळवले. दरम्यान, मोठा मुलगा अंशू सिंह यांचा वडिलांसोबत कौटुंबिक वाद होता. अंशूला घरखर्चासाठीही सुरेश सिंहच पैसे पुरवत होते. तर, त्यांचा लहान मुलगा लड्डू सिंह हा भाजपा नेता असून ठेकेदारही आहे. त्यामुळेच, तो वडिलांचाही लाडका आहे, त्यातून अंशू हे वडिलांवर रागावले. म्हणून वडिलांविरुद्धच ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी शड्डू ठोकला होता. मात्र, बाप बाप होता है, हे सुरेश सिंह यांनी सिद्ध करून दाखवलं.