निवडणुकीत भाजपचे २८, तर काँग्रेसचे ३0 मित्रपक्ष, मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 03:12 AM2019-05-03T03:12:45+5:302019-05-03T06:21:16+5:30
हरिश गुप्ता नवी दिल्ली : आधीच्या काही मित्रपक्षांकडून हात पोळले गेल्याने भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या लोकसभा ...
हरिश गुप्ता
नवी दिल्ली : आधीच्या काही मित्रपक्षांकडून हात पोळले गेल्याने भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या लोकसभा निवडणुकांसाठी नवे मित्रपक्ष शोधले आहेत. मतविभागणी टाळण्यासाठीच दोन्ही पक्षांनी यंदा जोर लावला आहेत. भाजपने राजस्थान लोकतांत्रिक पार्टीचे हनुमान बेनीवाल यांना जवळ करून लगेच उमेदवारी दिली आणि गुज्जर समाजाचे नेते किरोडीलाल बैंसला यांनाही आपल्या रालोआचा घटक बनवून त्यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांत झालेल्या पराभवामुळे भाजपने तिथे सारी ताकद लावायला सुरुवात केली आहे.
भाजपने यंदा ५४३ पैकी तब्बल १0५ जागा आपल्या मित्रपक्षांना सोडल्या असून, स्वत:चे उमेदवार ४३८ ठिकाणी रिंगणात उतरवले आहेत. तामिळनाडूमध्ये शिरकाव करण्यासाठी भाजपने अण्णा द्रमुकला आपलेसे केले. आधी भाजपचा तामिळनाडूमध्ये एकच खासदार होता. तिथे स्वत:च्या ताकदीवर लढण्याचा मानस भाजपने सोडला, याचे कारण तिथे द्रमुकसारख्या प्रबळ पक्षाशी सामना करायचा होता. केरळमध्ये भाजप तिसरा महत्त्वाचा पक्ष बनू पाहत आहे. तिथेही भाजपचा एकच खासदार असून, यंदा तिरुअनंतरपुरमची जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
भाजपचे २0१४ साली ४२ मित्रपक्ष होते. पण यंदा १९ मोठे व ९ किरकोळ असे २८ मित्रपक्षच भाजपसमवेत आहेत. त्यापैकी काहींचे उमेदवार रिंगणातच नाहीत. ते पक्ष केवळ भाजपला पाठिंबा देत आहेत. त्यात महाराष्ट्रातील रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उल्लेख करावा लागेल. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात शिवसेना, बिहारमध्ये संयुक्त जनता दल, उत्तर प्रदेशात अपना दल यांच्याशी भाजपला फारच जुळवून घ्यावे लागले. एवढेच नव्हेतर, आपल्या मित्रपक्षांच्या उमेदवारांसाठी आर्थिक व अन्य मदत देण्याचे काम भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले.
१६ मित्रपक्ष वाढवले काँग्रेसने याउलट काँग्रेसकडे २0१४ साली १४ मित्रपक्षच होते. त्यामुळे यंदा नवे मित्र शोधण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न केले आणि आता त्याकडे ३0 मित्रपक्ष आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट व भारतीय कम्युनिस्ट पक्ष केरळमध्ये काँग्रेसचे प्रतिस्पर्धी असले तरी ओडिशामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे पक्ष काँग्रेससोबत आहेत. पश्चिम बंगालमधील दोन मतदारसंघांत, जिथे माकपचे उमेदवार आहेत तिथे काँग्रेसने आपले उमेदवार यावेळी उभे केलेले नाहीत. नॅशनल कॉन्फरन्सला आपल्यासोबत घेण्यात काँग्रेसला यंदा यश आले आहे. महाराष्ट्रातही महाआघाडी करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत.