नवी दिल्ली : मध्य प्रदेश व मिझोरम या राज्यांमधील प्रचाराचा धुरळा सोमवारी खाली बसला. या दोन्ही राज्यांमध्ये २८ नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तेलंगणा व राजस्थानमध्ये ७ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, वरील चार व छत्तीसगड अशा पाच राज्यांत मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होईल.
राजस्थान व तेलंगणात सध्या राजकीय वातावरण तापले असून, तेथे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रोज झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राजस्थानच्या भिलवाडा येथील सभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्र व केंद्रात काँग्रेस सत्तेवर असतानाच १0 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी मुंबईत पाक दहशतवाद्यांनी हल्ला केला. हेच काँग्रेस नेते आज पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत आहेत. याला प्रत्युत्तर देत, संसदेवरील हल्ला तर वाजपेयी यांच्या काळातच झाला होता ना, असा सवाल काँग्रेस नेत्याने केला.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही राजस्थानात सभा घेतल्या. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिस्तीच्या दर्ग्याचे दर्शन घेतले आणि त्यावर चादर चढवली.
तेथून ते पुष्करच्या ब्रह्माच्या मंदिरातही दर्शनासाठी गेले. भाजपाचे नेते राहुल गांधी यांना त्यांचे गोत्र विचारत आहेत. त्यामुळे त्यांनी आपण काश्मिरी ब्राह्मण असून, आपले गोत्र दत्तात्रेय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.