कर्नाटकात प्रचारतोफा थंडावल्या, काँग्रेस, भाजपाची प्रतिष्ठा पणाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 05:59 AM2018-05-11T05:59:42+5:302018-05-11T05:59:42+5:30
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावल्या असून, २२३ जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. काँग्रेस व भाजपा यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकांत जनतेने कोणाला कौल दिला, हे मंगळवार, १५ मे रोजी स्पष्ट होईल.
बंगळुरू - कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावल्या असून, २२३ जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. काँग्रेस व भाजपा यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकांत जनतेने कोणाला कौल दिला, हे मंगळवार, १५ मे रोजी स्पष्ट होईल. प्रचारात भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, तर राहुल गांधी यांनी काँग्रेससाठी जीवाचे रान केले.
भाजपाने पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह राज्याबाहेरील तब्बल ३४ नेत्यांना प्रचारात उतरवले होते. काँग्रेसतर्फे मात्र राहुल गांधी व मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच स्टार प्रचारक होते. सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कर्नाटकात प्रचारासाठी एकच दिवस दिला. विविध जनमत चाचण्यांनी तिथे काँग्रेस वा भाजपा यापैकी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे म्हटले आहे. मात्र, काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असे सर्वच चाचण्यांचे निष्कर्ष आहेत. एच. डी. देवेगौडा यांच्या पक्षाचा पाठिंबा ज्याला मिळेल, तेच सरकार स्थापन करू शकतील, असे सांगण्यात येत आहे.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी दलित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने सातत्याने अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आम्हाला १३0 जागा मिळतील, असा दावा केला. राहुल गांधी व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही काँग्रेसला बहुमत मिळेल, अशी खात्री व्यक्त केली.
जातींना अधिक महत्त्व
मोदी व शहा यांनी काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, गुन्हेगारी, जातीयवाद व घराणेशाही यांचेच उदाहरण असल्याचा आरोप करीत जोरदार टीकास्त्र चालवले.
या निवडणुकांनंतर काँग्रेस केवळ पंजाब, पुडुच्चेरी व परिवार यापुरतीच शिल्लक राहील, असा टोला मोदी यांनी लगावला.
मात्र, यंदा प्रथमच निवडणुकीत जातींना अधिक महत्त्व आले आहे. काँग्रेसने ४९ लिंगायत व ४६ वोक्कालिगा समाजाच्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने ६८ लिंगायत तसेच ३८ वोक्कालिगा उमेदवार दिले, तर जनता दल (धर्मनिरपेक्ष)ने ४१ लिंगायत व ५५ वोक्कालिगा उमेदवार उभे केले आहेत.
हे कोट्यवधी कोणाचे?
या निवडणुकांच्या निमित्ताने पैसा, दारू व सोने, चांदी, कपडे यांची राजकीय पक्षांनी जणू मतदारांवर खैरातच केली. निवडणूक आयोग व अन्य तपास यंत्रणांनी रोख, दारू, सोने, चांदी व कपडे मिळून सुमारे १७१ कोटी रुपये जप्त केले. त्यात ८१ कोटी रुपये रोख आहेत.
याशिवाय २४ कोटींहून अधिक रकमेची दारू हस्तगत करण्यात आली आणि ४४ कोटींहून अधिक रकमेचे सोने व चांदी पकडण्यात आले. विशेष म्हणजे, नंतर त्यावर कोणीही दावा केलेला नाही; पण प्रत्यक्षात याच्या कितीतरी पट अधिक रक्कम व वस्तू वाटल्या गेल्या आहेत, असे सांगण्यात येते.
राहुल यांचा भाजपावर हल्ला
या निवडणूक प्रचारात राहुल गांधी यांनी सातत्याने भाजपा व मोदी यांच्यावर हल्ले चढवत, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांचा भ्रष्टाचार, त्यांचे खाण घोटाळ्यातील रेड्डी बंधूंशी असलेले संबंध, भ्रष्ट मंडळींना दिलेली उमेदवारी व दलित तसेच महिलांवरील अत्याचार यांचा उल्लेख केला. तसेच राफेल व्यवहारामुळे मोदींनी ठरावीक उद्योगपतींचा फायदा करून दिला, असे ते वारंवार म्हणाले.
मतदानाच्या तीन दिवस आधी बंगळुरूमध्ये सुमारे १0 हजार बोगस मतदार ओळखपत्रे सापडल्याने खळबळ माजली होती. त्यावरून दोन पक्षांत आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, चौकशी पूर्ण झाली नसल्याने हे प्रकरण मतदान होईपर्यंत तरी गुलदस्त्यांतच राहील.