नवी दिल्ली: यंदाच्या वर्षी देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुका (Election 2022) होऊ घातल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत कधीही घोषणा करेल, असे सांगितले जात आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या देशात वाढत आहे, ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत, अशाही परिस्थितीत केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणुका घेण्यावर ठाम आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या रिपोर्टनंतर केंद्रीय निवडणूक आयोग कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल, असे सांगितले जात आहे.
पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. याचे कारण उत्तर प्रदेशातील कल लोकसभा निवडणुकांचे चित्र काही प्रमाणात स्पष्ट करू शकतो, असे सांगितले जाते. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुका आठ टप्प्यात मतदान होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
पंजाबात तीन आणि मणिपूरमध्ये दोन
उत्तर प्रदेशसह पंजाबमध्येही विधानसभा निवडणूक होत असून, त्या तीन टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात. तर, मणिपूर विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होऊ शकतात. तर गोवा आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडू शकतील, असे सांगितले जात आहे. निवडणूक होत असलेल्या राज्यांतील कोरोनाची परिस्थिती, लसीकरण कार्यक्रम, या सगळ्याची माहिती गोळा करण्यात येत आहे. त्यानंतरच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, सन २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकाही आठ टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. तसेच निवडणुका असलेल्या सगळ्या राज्यांमध्ये कोरोना परिस्थितीनुसार जय्यत तयारी केली जात आहे.