नवी दिल्ली: निवडणूक आयोगानं पाच राज्यांमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 28 नोव्हेंबरला मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला निवडणूक होईल. छत्तीगसडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 12 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होईल. या पाचही राज्यांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. या सर्व राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत दिली.
छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 12 नोव्हेंबरला होईल. यासाठी 23 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 24 ऑक्टोबर आहे. या टप्प्यात 18 विधानसभा मतदारसंघात मतदान होईल. तप उर्वरित जागांवर 20 नोव्हेंबरला मतदान घेण्यात येईल. मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. 28 नोव्हेंबर रोजी या दोन्ही राज्यांमधील नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील.