तीन वर्षं निवडणूक लढवण्यास अपात्र ठरलेले 'राहुल गांधी' वेगळे; जाणून घ्या काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 12:19 PM2023-04-01T12:19:54+5:302023-04-01T12:37:05+5:30
२९ मार्चला लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 10A नुसार निवडणूक लढविण्यास अपात्र व्यक्तींची यादी निवडणूक आयोगाने जारी केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने २०१९ च्या मानहानी केसमध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे लोकसभेतून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. आता आणखी कायदेशीर लढाई बाकी असताना बातमी वायनाड मतदारसंघातून येत आहे. निवडणूक आयोगाने पाठविलेल्या यादीत राहुल गांधी असे नाव आहे. परंतू ते राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते नाहीत.
२९ मार्चला लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 10A नुसार निवडणूक लढविण्यास अपात्र व्यक्तींची यादी निवडणूक आयोगाने जारी केली आहे. यामध्ये राहुल गांधी असे नाव आहे. हे राहुल गांधी के ई आहेत. त्यांना निवडणूक आयोगाने तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यापासून अपात्र ठरविले आहे. राहुल गांधी केई यांनी वयाच्या ३३ व्या वर्षी वायनाडमधून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती.
राहुल गांधी के ई हे कोट्टायमचे रहिवासी आहेत. यादीनुसार त्यांना 9 सप्टेंबर 2021 पासून तीन वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. या राहुल गांधी के ईंनी निवडणूक लढविल्यानंतर निवडणूक खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे सादर केला नव्हता. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या यादीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे अद्याप नाव नाहीय. कारण त्यांना वरच्या न्यायालयात शिक्षेविरोधात अपिल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
वायनाडमधून रघुल गांधी नावाच्या व्यक्तीने देखील निवडणूक लढविली होती. यामुळे काहीसा फरक पाहता राहुल गांधी अशा नावाचे तीन व्यक्ती निवडणूक लढवत होते. राहुल गांधी केईना 2,196 मते तर रघुल गांधी यांना केवळ 845 मते मिळाली होती.