कोलकाता : भाजपाच्या रॅलीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना अमित शहा यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये आयोग डोळ्यांवर पट्टी बांधून बसला आहे. आयोगाला जर लाज वाचवायची असेल तर तृणमूलच्या नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शहा यांनी केली आहे.
भाजपाच्या रॅलीमध्ये कोलकात्याची जनता सहभागी झाली होती. जवळपास 8 किमीची रांग होती. यावेळी रॅलीपासून 200 मीटरवर मेडिकल कॉलेजच्या आवारातून हल्ला करण्यात आला. जनतेमध्ये भीती पसरविण्याचा हा प्रकार असून या हल्ल्याचा निषेध करतो. या हल्ल्यानंतर दीड तास रोड शो सुरु राहिला. हिंसेला उत्तर शांततेत मतदानाने द्या, असे आवाहन शहा यांनी केले.
भाजपाच्या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून तृणमूल काँग्रेस घाबरली आहे. यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीवेळी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांदरम्यान तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही बाजुने दगडफेक करण्यात आली. अमित शहांचा ट्रक जात असताना त्यावर काठ्या भिरकावल्याने तणाव निर्माण झाला. तसेच भाजपाचे पोस्टर, झेंडे तोडून टाकण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनीही दगडफेक केली.