'लोकसभेसह 4 राज्यांमध्ये एकाचवेळी निवडणूक घेण्यास आम्ही तयार'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 08:03 PM2018-08-15T20:03:39+5:302018-08-15T20:05:11+5:30
पुन्हा 'एकदा वन नेशन वन इलेक्शन'ची चर्चा
नवी दिल्ली: डिसेंबरमध्ये लोकसभेची निवडणूक होत असल्यास त्याच वेळी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आम्ही सक्षम आहोत, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. 'वन नेशन वन इलेक्शन'वरुन देशभरात चर्चा सुरू असताना निवडणूक आयोगाचे आयुक्त ओ. पी. रावत यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. विशेष म्हणजे कालच रावत यांनी सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊ शकत नसल्याचं म्हटलं होतं.
भाजपानं कालच वन नेशन वन इलेक्शनवरुन यू-टर्न घेतला होता. आधी वन नेशन वन इलेक्शनचा आग्रह धरणाऱ्या भाजपानं काल अचानक घूमजाव करत आपण अशी मागणी केलीच नव्हती, असं स्पष्टीकरण दिलं. तर आज निवडणूक आयोगाचे आयुक्त ओ. पी. रावत यांनी भूमिकेत बदल केला. एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शक्य नसल्याचं म्हणणाऱ्या रावत यांनी आज वेगळी भूमिका मांडली. लोकसभा निवडणूक निर्धारित वेळेच्या आधी घेतल्यास निवडणूक आयोग त्याचवेळी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यास सक्षम असल्याचं रावत म्हणाले. डिसेंबरमध्ये चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह लोकसभेची निवडणूक घेण्यास आम्ही तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांवेळीच लोकसभा निवडणूक झाल्यास त्यासाठी निवडणूक आयोग सज्ज आहे का, असा प्रश्न निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना रावत यांनी डिसेंबरमध्ये चार राज्यांसह लोकसभा निवडणूक घेण्यास सक्षम असल्याचं म्हटलं. मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ 15 डिसेंबरला संपणार आहे. तर छत्तीसगड विधानसभेची मुदत 5 जानेवारी 2019 रोजी संपेल. मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ अनुक्रमे 7 जानेवारी आणि 20 जानेवारीला संपणार आहे.