सदानंद नाईक, उल्हासनगरशहरातील शिधावाटप कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांच्या निवडणूक नेमणुका दोन पेक्षा जास्त मतदारसंघात झाल्याने, त्यांच्यात गोंधळ उडाला आहे. एकाच मतदारसंघात नेमणूका देण्याची विनंती कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. निवडणूक आयोगाच्या या सावळ्या गोंधळामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत दोन शिक्षकांचा बळी गेला.उल्हासनगर शहराचा भाग तीन मतदारसंघात विभागाला असून शहरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवडणूक उल्हासनगर, अंबरनाथ व कल्याण पूर्व मतदारसंघात होणे अपेक्षित असते. मात्र शिधावाटप कार्यालयातील शिधावाटप निरिक्षक व लिपिक श्यामकुमार काकड, शंकर होणमाने, मधुरा पटवर्धन, हर्षा कंदारकर, संदेश हके, शांताराम नाकडे, अस्मिता चव्हाण, कमल कटारी आदी कर्मचाऱ्यांची निवडणूक नेमणूका एकाचवेळी ठाण्यातील माजीवडा, भार्इंदर व उल्हासनगर मतदारसंघात झाल्या आहेत.शिधावाटप अधिकारी बी. सी. मुंडे यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची निवडणूक नेमणुका, एकाच वेळी तीन मतदारसंघात झाल्याचे निवडणूक आधिकारी बी.जी. गावंडे यांच्या निर्दशनात आणून दिले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना कार्यालय क्षेत्राजवळील मतदारसंघात नेमणूक देण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे. असंख्य कर्मचाऱ्यांची एका पेक्षा जास्त ठिकाणी नेमणूक झाल्याने कर्मचाऱ्यांत गोंधळ उडाला आहे. निवडणूक आयोगाच्या या सावळ्या गोंधळाने कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास झाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.गेल्या लोकसभा निवडणूकीत तक्षशिला शाळेतील एका शिक्षकाची नेमणूक घरोघरी निवडणूक स्लीप वाटण्यासाठी झाली होती. मात्र शिक्षकांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईला हलविण्यात आले होते. शिक्षकाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी सुट्टी देण्याची मागणी संबधीत अधिकारी यांना केली होती. मात्र सुट्टी न देता निवडणुकीच्या दिवशी शिक्षकाच्या गैरहजेरीत शिक्षकाच्या अल्पवयीन मुलीला निवडणूकीच्या कामाला जुपंले होते. मुंबई मधील रुग्णालयात उपचार घेत असतानां मतदानाच्या दिवशीच शिक्षकाचा दुपारी मृत्यू झाला. वडीलाच्या मृत्यूची माहिती मुलीना मिळाल्यावरही, संबधीत निवडणूक अधिका-याने मुलीला घरी जाऊ दिले नव्हते. निवडणूक संपल्यानंतरच निवडणूक भत्ता देऊन मुलीला जाऊ दिल्याचे उघड झाले होते. याप्रकाराने निवडणूक आयोगाचा सावळा-गोंधळ उघड झाला होता. आतातर एकाच कर्मचाऱ्याच्या निवडणूक नेमणूका तीन मतदारसंघात झाल्याने, आयोगाच्या गोंघळात भर पडली आहे. मात्र अशा लहान-मोठया चुका होतच असल्याची प्रतिक्रीया निवडणूक अधिकारी बी. जी. गांवडे यांनी दिली आहे.
उल्हासनगरात निवडणूक आयोगाचा गोंधळ!
By admin | Published: September 26, 2014 12:48 AM