७ टप्प्यांत मतदानाचा मोदींना फायदा? विरोधकांच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 05:19 PM2024-03-16T17:19:04+5:302024-03-16T17:22:39+5:30
Election Commission: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन १८ व्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 'चुनाव का पर्व, देश का गर्व' या घोषवाक्यासह यंदा लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम पार पडत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया पार पडत असून ९७.८ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. देशातील लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. याआधीही २०१४ आणि २०१९ मध्ये सात टप्प्यांत मतदान झाले होते.
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी तारखा जाहीर करण्याआधी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. कोणत्या वयोगटातील किती मतदार, तृतीयपंथी मतदारांची संख्या, ज्येष्ठ नागरिक आणि १०० हून अधिक वय असलेल्या मतदारांची आकडेवारी सांगितली. तसेच त्यांनी निवडणुकीच्या काळात हिंसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधिंनी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना काही प्रश्न केले. ७ टप्प्यांत होत असलेल्या मतदानाचा सत्ताधारी पक्षाला फायदा होतो या विरोधकांच्या आरोपावर बोलताना राजीव कुमार म्हणाले की, भौगोलिक परिस्थिती, सण, परीक्षा आणि इतर घटक लक्षात घेऊन ७ टप्पे आवश्यक आहेत असे निदर्शनास आले. त्यामुळे सात टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल.
दरम्यान, महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर देशातील संपूर्ण लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.
महाराष्ट्रात कधी आणि कुठे मतदान?
- पहिला टप्पा- १९ एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
- दुसरा टप्पा-२६ एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
- तिसरा टप्पा- ७ मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
- चौथा टप्पा- १३ मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
- पाचवा टप्पा- २० मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ