नवी दिल्ली - गेल्या काही काळात सरकारकडून विविध ओळखपत्रे आणि शासकीय योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आता निवडणूक आयोगही मतदार कार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समोर आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी मतदार कार्ड आधार कार्डसोबत जोडण्याचा आमचा विचार आहे. मात्र आधार कार्ड अनिवार्य करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. फेसबूकवरून झालेल्या डाटाचोरी प्रकरणी मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपले मत मांडले. त्यावेळी त्यांनी मतदार कार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्याचा मुद्दा मांडला."मतदार कार्ड आधार कार्डसोबत जोडण्याचा आमचा विचार आहे. मात्र आधार कार्ड अनिवार्य करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. तसेच सध्या फेसबूकवरून झालेल्या डाटाचोरीच्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, "नव्या तंत्रज्ञानासोबत फुंकून पावले टाकण्याची गरज आहे. यासंदर्भात आम्ही माहिती गोळा करत असून, त्यातून कोणत्याप्रकारचा धोका उदभवू शकतो, तसेच त्याला कसे रोखता येईल याबाबची चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावण्यात येईल. या संदर्भात आम्ही मतदारांना माहिती देणे सुरू ठेवू. तसेच सोशल मीडिया धोरणही कायम राहणार आहे," या प्रकरणी राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे अद्याप कुठलीही तक्रार आली नसल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. सध्या फेसबूक डाटा लीक प्रकरणावरून रणकंदन सुरू असून, काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आले आहेत.
निवडणूक आयोग मतदार कार्ड आधार कार्डशी जोडण्याच्या विचारात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 1:17 PM