नवी दिल्ली: अलीकडेच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार, पंजाबमध्ये ११७ जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान (Punjab Election 2022) होणार होते. मात्र, स्थानिकांची मागणी आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी लिहिलेल्या पत्रानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पंजाब विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची तारीख बदलली आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी एक महत्त्वाची बैठक घेतली. यामध्ये तारीख बदलण्याविषयी निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार आता पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी १४ फेब्रुवारी २०२२ ऐवजी २० फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान होणार आहे. पंजाबमधील सर्व पक्षीयांनी मतदानाची तारीख पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते.
संत रविदास जयंतीमुळे मतदान पुढे ढकलले
केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या बैठकीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, भाजप, काँग्रेस, पंजाब लोक काँग्रेस पक्ष यांसह अन्य राजकीय पक्षांनी पाठवलेल्या पत्रांवर विचारमंथन करण्यात आले. यानंतर पंजाबमधील निवडणूक पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यंदाच्या वर्षी १६ फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती साजरी केली जाणार असल्यामुळे पंजाबमधील निवडणुका त्यानंतर घेण्यात याव्यात, अशी विनंती करणारे पत्र जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने पंजाब निवडणुकीतील मतदान पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता पंजाब निवडणुकीसाठी २५ जानेवारी २०२२ रोजी अधिसूचना जारी होईल. १ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल, तर ४ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
संत रविदास यांची ६४५ जयंती
पंजाबमध्ये संत रविदास यांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. माघ पौर्णिमेला गुरू रविदास यांची जयंती असते. यंदाच्या वर्षी १६ फेब्रुवारी २०२२ रोजी संत रविदास यांची ६४५ वी जयंती आहे. या दिवशी पंजाबमधील भाविक मोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या गोवर्धनपूर या संत रविदास यांच्या जन्मगावी जातात. त्यामुळे हजारो मतदार १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही. या कारणास्ताव १४ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान पुढे ढकलावे, अशी विनंती चरणजीत सिंग चन्नी यांच्यासह माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही निवडणूक आयोगाला केली होती. संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त पंजाबमधून १३ आणि १४ तारखेला विशेष ट्रेनही सोडण्यात येणार आहेत.
दरम्यान, पंजाबमध्ये नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेत झालेली गडबड, माजी मुख्यंत्री कॅप्टन अरमिंदर सिंग यांनी काँग्रेसला केलेला रामराम आणि पंजाबमधील शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमारेषेवर तब्बल वर्षभर चाललेले आंदोलन या घटनांमुळे पंजाबच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. सध्या पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार असून, चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत. तर, आम आदमी पक्षानेही चंढीगड महापालिका निवडणुकीत वर्चस्व मिळवले. त्यामुळे, पंजाबमध्ये आप आणि भाजपच्या प्रचारयंत्रणेकडेही देशाचे लक्ष लागून असणार आहे.