ऑनलाइन लोकमत
तामिळनाडू, दि. १९ - तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह भाषण किंवा पेड कंन्टेटचा वापर करण्यात येऊ नये म्हणून हा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. अशाप्रकारे उमेदवारांच्या सोशल मिडीयातील युट्युब, फेसबुक, ट्विटर आणि ब्लॉगच्या अकाऊंटवर नजर ठेवण्याचा निवडणूक आयोगाचा तामिळनाडूमधील पहिलाच प्रयोग असणार आहे.
येथील स्थानिक सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या सायबरटेकने यासंबंधीचे एक सॉफ्टवेअर बनविले असून या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून उमेवारांच्या अकाउंन्टवर नजर ठेवण्यात येणार आहे. उमेदवारांकडून सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात येणारे फोटोग्राफ्स, ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स आणि ग्राफिक्सची पडताळणी या सॉफ्टवेअरद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी राजेश लखोनी यांनी दिली. तसेच, यामध्ये काही आक्षेपार्ह भाषण आणि पेड कंन्टेट आढळल्यास संबंधीत उमेदवाराला नोटीस पाठविण्यात येणार असल्याचेही राजेश लखोनी म्हणाले.