नवी दिल्ली : घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून निरपेक्षपणे काम करण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरत असून या संस्थेची विश्वासार्हताच पणाला लागली असल्याची खंत ६६ निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी राष्टÑपती रामनाथ कोविंद यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. आचार संहितेचा भंग करण्याचे अनेक प्रकार घडत असूनही निवडणूक आयोग त्याबाबत खंबीर भूमिका घेत नसल्याचा आरोपही या पत्रामध्ये करण्यात आला आहे.
भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या निवडणूक प्रक्रियेची अतिशय पारदर्शक आणि निष्पक्षपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी घटनेने निवडणूक आयोगावर सोपविली आहे. आयोगाने आजपर्यंत अनेक समस्यांवर मात करीत आपली निष्पक्षता कायम राखली. मात्र सध्याच्या काळामध्ये निवडणूक आयोग आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडत नसल्याची खंत पत्रामध्ये व्यक्त केली आहे. यामुळे मतदारांना निर्भयपणे मतदान करता येईल की नाही, असा संभ्रम निर्माण झाल्याचेही या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
आमचा कुणा राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे या अधिकाऱ्यांनी पत्रामध्ये स्पष्ट केले आहे. गेली सहा दशके आमच्यापैकी अनेकजण निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. घटनेच्या ३२४ व्या कलमाने निवडणूक आयोगाला स्वतंत्रपणे काम करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मात्र त्याचा वापर आयोगाकडून होत नसल्याची खंतही या अधिकाºयांनी पत्रामध्ये व्यक्त केली आहे. आचारसंहिता भंगाची अनेक प्रकरणे होत असताना आयोग त्याविरोधात कडक कारवाई करीत नाही. याबाबत पंतप्रधानांनी मिशन शक्ती फत्ते झाल्याची केलेली घोषणा, मोदी यांच्या बायोपिकचे ११ एप्रिल रोजी होत असलेले प्रकाशन, पंतप्रधान मोदी यांच्यावरील वेब सिरियलचे सुरू असलेले प्रक्षेपण, नमो टीव्हीचे सुरू झालेले प्रसारण, योगी आदित्य नाथ यांचे मोदी सेनेबाबतचे विधान अशी उदाहरणेही पत्रात दिली आहेत. आयोगाच्या गुडघे टेकण्याच्या भूमिकेमुळे सामान्य मतदार मुक्त वातावरणामध्ये आपला अधिकार बजावू शकणार नाहीत, अशी भीतीही या अधिकाºयांनी व्यक्त केली आहे.हे आहेत अधिकारीपत्र लिहिणाºयांमध्ये दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, माजी केंद्रीय परराष्टÑ सचिव शिवशंकर मेनन, सुपरकॉप जे. एफ. रिबेरो, निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर, अॅना दाणी, जगदीश जोशी, व्ही. पी. राजा, रामाणी व्यंकटेशन आदि प्रमुख आहेत.