Lok Sabha Exit Poll Result 2024 : एप्रिल महिन्यापासून सुरु असलेल्या लोकसभेच्या निवडणुका आज अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. शनिवारी १ जून रोजी ८ राज्यांमध्ये ५७ जागांवर मतदान पार पडत आहे. ४४ दिवसांच्या निवडणूक प्रक्रियेनंतर ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी देशात सर्वत्र एक्झिट पोलबाबत चर्चा सुरु आहे. एक्झिट पोलचे निकाल येण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून एक्झिट पोल प्रसिद्ध होतील. मात्र त्याआधीच निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर देशातील सर्व ५४३ जागांवर मतदान पूर्ण होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर निवडणूक आयोगाने एक्झिट पोलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने माध्यम समूहांना मतदानानंतर वर्तवण्यात येणाऱ्या एक्झिट पोलबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील शेवटच्या दिवशी निवडणूक आयोगाने एक्झिट पोलचे निकाल सायंकाळी साडेसहा वाजण्यापूर्वी दाखवण्यास बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करून हा आदेश दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधी कायदा (१९५१) च्या पोटकलम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की १ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी असेल. म्हणजेच १ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजेनंतरच कोणतेही टीव्ही चॅनल किंवा इतर मीडिया हाऊस एक्झिट पोलचे थेट प्रक्षेपण करू शकतात.
यंदाची लोकसभा निवडणूक ही १९ एप्रिलपासून सुरू झाली होती. गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात सत्तेत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ते सलग तिसऱ्यांदा सत्तेत येतील असा दावा भाजपकडून केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेस इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांसह निवडणुकीत उतरली होती. इंडिया आघाडीनेही ३०० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला होता. त्यामुळे आता थोड्याच वेळात येणाऱ्या एक्झिट पोलवरुन याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.