नवी दिल्ली - निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी दोन प्रकरणात क्लीनचीट दिली आहे. 23 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे काढलेल्या रोड शोविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास येत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे 9 एप्रिल रोजी दिलेल्या भाषणात नवीन मतदारांना बालकोट एअर स्ट्राईकचा उल्लेख करत शहीद झालेल्या जवानांप्रती तुमचं मत समर्पित करा असं आवाहन केलं होतं. त्यामध्येही पंतप्रधानांना क्लीनचीट दिल्याची माहिती आहे. त्याच दिवशी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात औसा येथेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाप्रकारे नवीन मतदारांना आवाहन केलं होतं. अद्याप आयोगाकडून या दोन्ही प्रकरणांमध्ये घेण्यात आलेले निर्णय सार्वजनिक केले नाहीत. मात्र आत्तापर्यंत ही दोन्ही प्रकरणं मिळून एकूण 8 प्रकरणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाकडून क्लीनचीट देण्यात आली आहे.
गुजरात निवडणूक आयोगाकडून प्रथमदर्शनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं नसल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केल्यानंतर रोड शो करत विरोधकांवर राजकीय टीका केली होती. हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. याआधीही निवडणूक आयोगाकडून मोदी यांचे सहा भाषण, शाह यांचे दोन भाषण आणि काँग्रेस अध्यक्षांच्या एका भाषणावर घेण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावले होते.
मोदींना तीन, राहुल गांधींना एका प्रकरणात क्लिन चीट, निवडणूक आयोगाचा निर्णय
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल क्लीन चीट देणाऱ्या अधिकाऱ्यांमध्येच मतभेद असल्याचे समोर आलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून मोदींना क्लीन चीट देण्याच्या निर्णयावर निवडणूक आयोगाच्याच काही अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील वर्धा येथे निवडणूक प्रचार सभेत संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वायनाडमध्ये अल्पसंख्याक मतदार अधिक असल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तेथून निवडणूक लढत असल्याचं म्हटलं होतं. तसेच, लातूर येथील सभेत जवानांच्या नावाने मतदान मागितले असल्याचा आरोप सुद्धा कॉंग्रेसने मोदींवर केला होता. वर्धा येथील प्रकरणांतही मोदींना निवडणूक आयोगाकडून क्लीनचीट देण्यात आली होती.