हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 07:43 PM2024-10-29T19:43:11+5:302024-10-29T19:45:25+5:30
काँग्रेसने हरयाणा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीवर आज आयोगाने उत्तर दिले आहे.
मागील महिन्यात हरयाणा निवडणुकीचे निकाल समोर आले. या निकालानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर निवडणूक आयोगाने मंगळवारी उत्तर दिले. एक निवेदन जारी करून काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांना मतदान आणि मतमोजणीच्या दिवसांसारख्या संवेदनशील वेळी निराधार आणि खळबळजनक तक्रारीबाबत आवाहन केले.
बेजबाबदार आरोपांमुळे जनतेमध्ये अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते, असे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसला निवडणुकीनंतर बिनबुडाचे आरोप करणे टाळण्याचे आवाहन केले. आयोगाने काँग्रेसला ठोस पावले उचलण्याचे आणि अशा तक्रारींच्या प्रवृत्तीला आळा घालण्याचे आवाहन केले.
PM मोदींची कोट्यवधी वृद्धांना दिवाळी भेट; दरवर्षी 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार...
आयोगाने म्हटले आहे की, हरयाणातील निवडणूक प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा निर्दोष होता आणि तो काँग्रेस उमेदवार किंवा एजंटांच्या देखरेखीखाली पार पडला. २६ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांनी सखोल फेरपडताळणी केली. सर्व तक्रारींवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून काँग्रेसला १६०० पानांचे उत्तर दिले आहे.
हरयाणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तक्रारी फेटाळून लावल्या. हरयाणा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी ईव्हीएममध्ये ९९ टक्के बॅटरीची स्थिती दिसून आल्याची भीती काँग्रेसने व्यक्त केल्यानंतर, मशिन्समध्ये संभाव्य छेडछाड झाल्याची तक्रार आणि अधिकाऱ्यांवर मतमोजणीला जाणूनबुजून उशीर केल्याचा होता.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने ९० पैकी ४८ जागांवर बहुमत मिळवले आहे. दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपविरोधात सत्ताविरोधी लाटेचा फायदा उठवण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसला ३७ जागांवर विजय मिळवता आला आहे. याशिवाय INLD ने २ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.