अहमदाबाद - काँग्रेसकडून निवडणूक आयोग भाजपाची मदत करत असल्याचा आरोप लावण्यात आल्यानंतर, आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दावा केला आहे की, 2012 रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या बाजूने काम केलं होतं. इंडिया टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना विजय रुपानी यांनी सांगितलं की, '2012 विधानसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींना काम करण्यापासून रोखता यावं यासाठी काँग्रेसच्या इशा-यावर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली होती. राज्य सरकारला आपली विकास कामं पुर्ण करता येऊ नयेत यासाठी हा डाव खेळण्यात आला होता'. 2012 रोजी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही एस संपत यांनी 3 गुजरात आणि हिमाचल प्रदेशची एकत्रित निवडणूक जाहीर केली होती.
विजय रुपानी बोलले आहेत की, त्यावेळी आचारसंहिता 83 दिवस सुरु होती. त्यावेळी व्ही एस संपत यांच्यासोबत नसीम जैदी आणि एच एस ब्रम्हादेखील निवडणूक आयोगात होते. व्ही एस संपत यांनी सर्व आरोप फेटाळून लावत विजय रुपाने चुकीचं आणि निराधार वक्तव्य करत असल्याचं म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसशी झालेल्या बातचीतमध्ये त्यांनी सांगितलं की, 'निवडणूक आयोग नेहमीच आपल्या परंपरा आणि नियमांचं पालन करत आलं आहे. आयोगाने कधीही आपल्या घटनात्मक कर्त्यवांशी तडजोड केलेली नाही. निवडणूक होऊन पाच वर्ष झाल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य करणं अजिबात योग्य नाही'.
व्ही एस संपत यांच्यासहित एच एस ब्रम्हा यांनीदेखील 2012 रोजी दबावाखाली काम केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. एच एस ब्रम्हा यांनी सांगितलं आहे की, 'आचारसंहितेचा काळ थोडा मोठा होता. पण आम्ही एखाद्या पक्षाच्या दबावाखाली येऊन काम केल्याचा आरोप करणं चुकीचं आहे'.
निवडणूक आयोगाने नुकतीच हिमाचल प्रदेश निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे, मात्र अद्याप गुजरात निवडणुकीची तारीख सांगितलेली नाही. यावरुनच वाद सुरु झाला असून, विरोधकांनी निवडणूक आयोगावर भाजपाला मदत केल्याचा आरोप लावण्यास सुरुवात केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 9 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल, असे वृत्त होते. मात्र केवळ हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्याच तारखा जाहीर झाल्या.
हिमाचल प्रदेशमध्ये आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेचे 68 सदस्य असून, तेथे सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपा या प्रमुख पक्षांमध्ये चुरस असेल. हिमाचल प्रदेशमध्ये 7 हजार 251 मतदान केंद्रे असतील. राज्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण होईल. मतदान, नामांकन आणि प्रचार फेऱ्यांचे चित्रिकरण होईल.