नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याबद्दल काँग्रसने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य आचारसंहिता भंग करणारे असल्याचे सांगत, काँग्रेस नेत्या यांनी तक्रार केली होती. तसेच, याबाबत मोदींवर कारवाई करण्याचीही मागणी केली होती.
काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाचा मुद्दा घेऊन लोकसभा निवडणुकीचे पुढचे दोन टप्पे लढून दाखवावे, असे खुले आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील चायबासा येथील जाहीर सभेत दिले होते. तत्पूर्वी, मोदींनी 'राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर वन' असा आरोप केल्याने मोठे वादळ उठले आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मोदींवर कठोर शब्दांत प्रहार केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसचे सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधानांच्या विधानाचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज चायबासा येथील सभेतून पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. त्यानंतर काँग्रेसच्यावतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान पदावर असताना, त्यांनी अशी भाषा वापरणे चुकीचे असल्याचे काँग्रने तक्रारीत म्हटले होते. तसेच, मोदींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली होती. मात्र, आयोगाने याबाबत मोदींना क्लीन चीट दिली आहे. मोदींच्या भाषणातून आचारसंहिता भंग झाल्याचे कुठेही आढळून आले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षानेही नरेंद्र मोदींविरुद्ध निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली होती. पंतप्रधान मोदींच्या एका भाषणात भारतीय लष्कराचा उल्लेख राजकीय लाभासाठी करण्यात आल्याचा आरोप आपने केला होता. मात्र, निवडणूक आयोगाने त्यामध्येही मोदींना क्लीन चीट दिली होती.