राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचे चर्चेचे निमंत्रण; मतदारयादीतील कथित घोळाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 06:55 IST2025-03-12T06:55:15+5:302025-03-12T06:55:23+5:30
एकसारखे मतदार ओळखपत्र क्रमांक असल्याचा मुद्दा संसदेतही गाजला

राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचे चर्चेचे निमंत्रण; मतदारयादीतील कथित घोळाचा आरोप
नवी दिल्ली : मतदार यादीतील कथित गोंधळाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.
राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांकडून निवडणूक नोंदणी, अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या पातळीवर कोणत्याही अडचणीच्या मुद्द्यांवर ३० एप्रिलपर्यत राजकीय पक्षांकडून मते मागवली आहेत.
चर्चा करण्याचा सल्ला
विविध राजकीय पक्षांना मंगळवारी पाठवलेल्या वेगवेगळ्या पत्रांत पक्षाध्यक्षांसह ज्येष्ठ सदस्यांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.
आयोगाने दिल्या होत्या सूचना
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या आठवड्यात आयोगाच्या वतीने आयोजित एका संमेलनात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना राजकीय पक्षांशी नियमित चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यातून कायदेशीर मार्गाने तोडगा शोधून ३१ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते.
राहुल गांधी यांची मागणी
एकसारखे मतदार ओळखपत्र क्रमांक असल्याचा मुद्दा संसदेतही गाजला होता. यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही संसदेत चर्चा करावी, अशी मागणी केली होती. याशिवाय इतर अनेक राजकीय पक्षांनी मतदारयाद्यांबाबत शंका उपस्थित केल्या होत्या.