नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला असून मतदानासाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. शनिवारी (8 फेब्रुवारी) सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान होईल. तत्पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. केजरीवाल यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत मतदारांना आकर्षित करण्यासाठीही सर्वच पक्षांनी आतोनात प्रयत्न केले. आता, प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मतदानप्रक्रियेकडे सर्वांचीच ओढ लागली आहे. बुथ कंट्रोलिंगसाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. तर, प्रचारतोफा थंडावल्यानंतरही भाजपा आणि आपमधील शाब्दीक वार थांबलं नाही. कारण, अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे, शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोगाने केजरीवाल यांना उत्तर मागितले आहे. भाजपाने दिल्ली पोलिसांकडे आम आदमी पक्षाच्या समर्थकांनी खोटी कागदपत्रे वाटून भाजपाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी भाजपाने केली होती. पोलिसांनीही संबंधित तक्रारीची दखल घेऊन एकास अटक केली आहे. याबाबत, केजरीवाल यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र, प्रचार बंद झाल्यानंतर व्हिडीओ पोस्ट करणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचं आयोगाने म्हटले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी जवळपास 1 कोटी 46 लाख मतदारांच्या हातात उमेदवारांचे भवितव्य आहे. यातील 80 लाख 55 हजार पुरुष व 66 लाख 35 हजार महिला मतदार आहेत. 70 मतदारसंघांमध्ये 2688 मतदान केंद्रांची व्यवस्था आयोगाने केली आहे. यातील 516 मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील श्रेणीत ठेवण्यात आले आहे. 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.