नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या 'मैं भी चौकीदार' या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केल्याबद्दल निवडणूक आयोगाने दूरदर्शनला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खासगी वाहिन्यांवर निवडणूक आयोग बंधने घालू शकत नाही. मात्र सरकारी मालकीच्या दूरदर्शनवर आयोगानी बंधने आहेत. ती झुगारून दूरदर्शने ३१ मार्च रोजी मोदी यांच्या मै भी चौकीदार या कार्यक्रमाचे तब्बल दीड तास थेट प्रक्षेपण केले होते. त्याबद्दल ही नोटीस बजावली आहे. या कार्यक्रमाचे खासगी वाहिन्या, एफएफ चॅनल्स व सोशल मीडियाद्वारे थेट प्रक्षेपण झाले होते. दूरदर्शनने थेट प्रक्षेपण केल्याबद्दल आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे दूरदर्शनला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याविरोधात काँग्रेस व आम आदमी पक्षाने आयोगाकडे तक्रार केली होती. तिच्या आधारे आयोगाने दूरदर्शनला नोटीस बजावली आहे.नमो टीव्ही ही विनापरवाना वाहिनी'नमो टीव्ही'वरून भाजपचा २४ तास प्रचार करण्यात येत असल्याबद्दलही निवडणूक आयोगाने माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागवले आहे. आम आदमी पक्ष व काँग्रेसने या वाहिनीवरून भाजप व मोदी यांच्या प्रचाराचे कार्यक्रम दाखवण्यात येत असल्याची तक्रार केली आहे. नमो टीव्ही ही विनापरवाना वाहिनी असून, त्यावरून प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाचा खर्च भाजप करीत आहे, असे उत्तर माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिले असल्याचे समजते. निवडणुकीच्या काळात सुमारे ३५0 विनापरवाना वाहिन्या सक्रिय झाल्याचे कळते. सर्व महत्त्वाच्या डीटीएच कंपन्यांनी ग्राहकांना विश्वासात न घेता नमो टीव्ही वाहिनी दाखवणे सुरु केले आहे. त्याबद्दल अनेक ग्राहकांनीही तक्रार केली आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय मोफत वाहिनीही दाखवण्याची या कंपन्यांना परवानगी नाही, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.
निवडणूक आयोगाने दूरदर्शनला बजावली कारणे दाखवा नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 7:18 AM