नवी दिल्ली : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. रिक्त होणाऱ्या ५६ पैकी ६ जागा महाराष्ट्रातील आहेत. राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तसेच, त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी घोषणा केली.
१३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. तर दोन राज्यांतील उर्वरित ६ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिलला संपणार आहे. ज्या १५ राज्यांत राज्यसभा निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे.
दरम्यान, नऊ केंद्रीय मंत्र्यांसह राज्यसभेच्या ६८ सदस्यांचा कार्यकाळ यावर्षी पूर्ण होत आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांत आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह ५७ नेत्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात पूर्ण होत आहे.
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, श्री. व्ही. मुरलीधरन आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षांकडून पुन्हा या खासदारांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली जाते की इतर कोणाला पाठवले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
महाराष्ट्रातील ६ खासदारांचा कार्यकाळ संपतोय- कुमार केतकर, काँग्रेस- वंदना चव्हाण, राष्ट्रवादी (शरद पवार गट)- प्रकाश जावडेकर, भाजप- मुरलीधरन, भाजप- नारायण राणे, भाजप- अनिल देसाई (शिवसेना उद्धव ठाकरे गट)