निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला जाहिरात थांबविण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 04:03 AM2023-11-23T04:03:45+5:302023-11-23T10:09:17+5:30
काँग्रेसच्या या जाहिरातीबाबत भाजपने आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राजस्थानमधील मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना, निवडणूक आयोगाने काँग्रेसला मिस्ड कॉलसंदर्भातील जाहिरात थांबविण्याचे आदेश दिले, तसेच त्यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या आवाजात काँग्रेस पक्षाची ७ आश्वासने मतदारापर्यंत पोहोचवली जात होती.
काँग्रेसच्या या जाहिरातीबाबत भाजपने आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि माजी मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आयोगात धाव घेतली होती. ही जाहिरात आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले होते.
‘व्होट फ्रॉम होम’ तेलंगणात सुरू
हैदराबाद : तेलंगणातील ३३ पैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ नागरिक, दिव्यांग यांना ‘घरीच मतदान’ ही प्रक्रिया सुरू झाली असून, ती २६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) विकास राज यांनी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, “२१ नोव्हेंबरपासून बहुतांश जिल्ह्यांमध्ये घरपोच मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इतर सर्व जिल्ह्यांमध्येही ती सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून, ती २६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल.
तेलंगणामध्ये प्रथमच, ८० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना, तसेच दिव्यांगांना (त्यांची इच्छा असल्यास) घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.