नवी दिल्ली - भाजपाच्यानिवडणूक प्रचाराचे तंत्र असलेल्या नमो टीव्हीच्या प्रक्षेपणावर निवडणूक आयोगाने बंदी आणली होती. मात्र, आता काही अटी आणि शर्ती घालत आयोगाने या टीव्हीवरील प्रक्षेपणाला परवानगी दिली आहे. केवळ Live प्रक्षेपण करण्यास आयोगाने परवानगी दिली असून कुठलेही रेकॉर्डेड प्रोग्राम या टेलिव्हीजनवरुन दाखवू नका, असे आयोगाने सांगितले आहे.
निवडणूक आयोगाने राज्य मुख्य निवडणूक आयोगाला याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. नमो टीव्हीवर निवडणूक काळात फक्त लाईव्ह प्रोग्रामच प्रक्षेपित करता येतील, असे आयोगाने म्हटले आहे. प्रि-रेकॉर्ड केलेले कुठलेही प्रोग्राम दाखविण्यास मनाई करण्यात आली आहे. मीडिया कमिटीने प्रमाणपत्र दिल्याशिवाय नमो टीव्हीवरून कोणत्याही कार्यक्रमांचे प्रक्षेपण न करण्याची ताकीद दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला दिली होती. या संदर्भात एक पत्र भाजपला पाठविण्यात आले होते. तसेच, या टीव्हीच्या कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे. नमो टीव्ही हा नमो अॅपचा भाग असल्याचा खुलासा भाजपाने निवडणूक आयोगाकडे केला होता. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने याबाबतचा अहवाल मागविला होता. तसेच नमो टीव्हीवर प्रमाणपत्राशिवाय असलेला सर्व मजकूर तत्काळ हटविण्याचे आदेश दिले होते.
नमो टीव्ही हा आमच्याच नमो अॅपचा भाग असून, त्याचे प्रक्षेपण टेलीकास्ट न करता वेबकास्ट केले जाते, असे भाजपने मान्य केले आहे. मात्र, नमो टीव्हीवर दाखवली जाणारी भाषणे व मुलाखती यांच्यासाठी पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच नमो टीव्हीच्या लोगोसाठी संमती घेण्यात आली होती, त्यावर कोणताही कार्यक्रम, भाषणे मुलाखती दाखवण्यासाठी आमची संमती घेण्यात आलेली नाही, असे निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नमो टीव्हीवरील कार्यक्रम हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची तक्रार काँग्रेस व आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने बुधवारी काढलेल्या आदेशानुसार नमो टीव्ही दाखवणे गैर होते. तरीही आम्ही कार्यक्रम टेलीकास्ट नव्हे, तर वेबकास्ट करतो आणि त्यासाठी आम्ही स्लॉट विकत घेतला आहे, असा दावा भाजपने केला होता. त्यानुसार, आता केवळ लाईव्ह प्रक्षेपणास परवानगी देण्यात आली आहे.