पणजी : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल येथे गेल्या २९ जानेवारी रोजी मतदारांसमोर केलेल्या विधानाची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली व पर्रीकर यांना नोटीस बजावली आहे. कोणीही पैसे दिल्यास ते घ्या; पण मत मात्र भाजपला द्या, अशा अर्थाचे विधान करून पर्रीकर यांनी प्रथमदर्शनी निवडणूक आचारसंहितेचा उल्लंघन केल्याचा ठपका आयोगाने ठेवून तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये, याबाबत उद्या शुक्रवारी ३ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत स्पष्टीकरण द्यावे, असे आयोगाने नोटिसीद्वारे पर्रीकर यांना सांगितले आहे.गोवा फॉरवर्ड पक्षाने आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनीही पर्रीकर यांच्याविरुद्ध आयोगाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाने उत्तर गोवा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागून घेतला. पर्रीकर यांनी चिंबल येथे लोकांची बैठक घेतली होती. आता तुम्हाला कोणी तरी एक हजार रुपये किंवा तीन हजार रुपये देतील. मात्र, आम्ही तुम्हाला दरमहा दीड हजार रुपये देतो. पाच वर्षांनंतर हे दीड हजार रुपये म्हणजे नव्वद हजार रुपये होतील. त्यानंतरही ते वाढतील. पुढील पाच वर्षांत तुम्हाला एक लाख ते सव्वा लाख रुपये मिळतील, असा युक्तिवाद पर्रीकर यांनी मतदारांसमोर केला होता.तसेच आज तुम्ही कोणाकडूनही दोन हजार रुपये घ्या व मतदान करा. कुणी जर पाचशे रुपये घेऊन कुणासोबतही रॅलीसाठी फिरत असेल तर आम्हाला समस्या नाही; पण मत मात्र भाजपला द्या, असे पर्रीकर यांनी म्हटल्याचे तक्रारीत नमूद झाले आहे. तक्रार व तक्रारीसोबत सादर झालेली सीडीही आयोगाने पाहिली. तुमचे हे विधान म्हणजे निवडणूकविषयक लाचखोरीच्या गुन्ह्याला प्रोत्साहन देणारे ठरते. आयोगाने पर्रीकर यांना पाठविलेल्या नोटिसीत म्हटले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पत्रकारांनी पर्रीकर यांना त्यांच्या विधानाबाबत विचारले असता, निवडणूक आयोगाने अगोदर चौकशी करू द्या व आपला पॉइंट काय आहे ते शोधून काढू द्या, अशी प्रतिक्रिया पर्रीकर यांनी व्यक्त केली होती. (खास प्रतिनिधी)
निवडणूक आयोगाने पाठवली मनोहर पर्रीकर यांना नोटीस
By admin | Published: February 02, 2017 2:30 AM