अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचे आज मतदान संपले. अखेरच्या टप्प्यातील मतदानानंतर आता निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रचारादरम्यान झालेल्या आचारसंहिता उल्लंघनांबाबतचा अहवाल मागवला आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी आयोगाने म्हटले की, बुधवारी रात्री काँग्रेसचे एक शिष्टमंडळ आपल्या आरोपांसह निवडणूक आयोगाकडे आले होते. त्यानंतर आयोगाने यावर कारवाई करीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना गुरुवारी दुपारपर्यंत या प्रकरणाचा अहवाल सोपवण्यास सांगितले होते. या प्रकरणी आलेल्या तक्रारींवर अजूनही चौकशी सुरु असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी पाणबुडी उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याबद्दलचे एक प्रकरण आचारसंहितेच्या उल्लंघनाशी निगडित असल्याचे निवडणूक आयोगाने यावेळी सांगितले. हे प्रकरण अद्याप एमसीसीच्या अखत्यारित असून यासाठी आयोगाकडून कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या मुद्द्यांवर भाजपचे एक शिष्टमंडळ गुरुवारी आपली बाजू मांडण्यासाठी आयोगाकडे आले होते. मात्र, यावर आयोगाकडून चौकशी केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
भाजपाने निवडणूक आयोगाला कळसूत्री बाहुली बनवले : काँग्रेस गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान, कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेऊन आज भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला. मतदानानंतर पंतप्रधान मोदींचा रोड शो म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सुरजेवाला यांनी सांगितलं. निवडणूक आयोग पंतप्रधान मोदींच्या सचिवाप्रमाणे काम करत आहे, ही निवडणूक आयोगासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे अशा शब्दात सुरजेवाला यांनी टीका केली आहे.
राहुल गांधींच्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस-
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी राहुल गांधी यांच्या प्रसारित झालेल्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. तसेच या नोटिशीला 18 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच ही मुलाखत प्रसारित करणाऱ्या स्थानिक गुजराती वाहिन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. राहुल गांधी यांची मुलाखत काही गुजराती वाहिन्यांवरून प्रसारित झाली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्या मुलाखती प्रसारित करण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांना 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या प्रकरणी आपली बाजू मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. या काळात त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा विचार निवडणूक आयोगाकडून करण्यात येऊ शकतो. याबाबत गुजरातचे मुख्य निवडणूक आयुक्त बी. बी. स्वाइन म्हणाले, राहुल गांधींच्या मुलाखतीच्या प्रसारणाबाबत आम्हाला तक्रार मिळाली आहे. या मुलाखतीची डीव्हीडी आम्ही मिळवली असून, या प्रकरणाची चौकशी होईल. त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल.