मोदी, शहांसमोर निवडणूक आयोगाची शरणागती, काँग्रेसचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 10:26 AM2019-05-16T10:26:28+5:302019-05-16T10:38:03+5:30
कोलकाता येथे अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे.
नवी दिल्ली - कोलकाता येथे मंगळवारी अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. दरम्यान, या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारावर एक दिवस आधीच बंदी घालण्याचा निर्णय हा घटनाविरोधीत आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
LIVE: Press briefing by @rssurjewala, I/C, AICC Communications. https://t.co/UyAP2WZfPa
— Congress Live (@INCIndiaLive) May 16, 2019
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बंगालमधील परिस्थितीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर शरणागती पत्करल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. ''निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार एक दिवस आधीच थांबवण्याचा घेतलेला निर्णय हा घटनाविरोधी आहे. तसेच निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज होणाऱ्या सभा विचारात घेऊन आज रात्रीपासून निवडणूक प्रचार थांबवण्याची घोषणा केली आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी केला.
देशात निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया धोक्यात आली आहे. काँग्रेसने मोदींकडून होत असलेल्या आचारसंहितेच्या उल्लंघनाचे सबळ पुरावे दिल्यानंतरही काही कारवाई झालेली नाही. तसेच मोदींचा प्रोपेगेंडा असलेल्या नमो टीव्हीवरही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. तसेच कोलकात्यामध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मूर्तीची मोडतोड भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी केली, असा दावाही त्यांनी केला.