Jairam Ramesh : लोकसभा निवडणुकीसाठी देशात शनिवारी सातव्या टप्प्यातील मतदान पार पाडलं. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानादरम्यान काँग्रेसने मोठा दावा केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप लावले. गृहमंत्री अमित शाह हे जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत, असा आरोप जयराम रमेश यांनी केला होता. काँग्रेसच्या या आरोपाची आता थेट निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केला होता की, गृहमंत्री अमित शाह यांनी मतमोजणीच्या आधी १५० जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन धमकावले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील पोस्टद्वारे केलेल्या सार्वजनिक वक्तव्याबाबत वस्तुस्थिती आणि तपशील मागितला आहे. जयराम रमेश यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाने दखल घेतली असून त्यांना याबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने जय राम रमेश यांच्याकडून रविवारी सायंकाळपर्यंत उत्तर मागितले आहे.
काय म्हणाले होते जयराम रमेश?
"गृहमंत्री आज सकाळपासून जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर बोलत आहेत. आतापर्यंत १५० अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. अधिकाऱ्यांना उघडपणे धमकावण्याचा हा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. लक्षात ठेवा लोकशाही धमक्यांवर नव्हे तर आदेशावर चालते. ४ जूनच्या जनादेशानुसार नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप सत्तेतून बाहेर पडतील आणि भारताचा विजय होईल. अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न येता संविधानाचे रक्षण करावे. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, आता निवडणूक आयोगाने काँग्रेसचे जयराम रमेश यांना मतमोजणीपूर्वी गृहमंत्र्यांनी १५० जिल्हा दंडाधिकाऱ्यांना फोन केल्याच्या त्यांच्या दाव्यांचा तपशील देण्यास सांगितले आहे. पुढील कारवाईसाठी निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे २ जूनच्या सायंकाळपर्यंत उत्तर मागितले आहे.