कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीकरिता पाहणीसाठी निवडणूक उपायुक्त सुदीप जैन यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक त्या राज्यात आले आहे. या पथकाने त्या राज्यातील दक्षिण व उत्तर भागातील काही जिल्हाधिकारी, आयएएस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चाही केली. बुधवारी या पथकाचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होतील, त्या वेळीही कोरोना साथ काही प्रमाणात कायम असेल, अशी अटकळ आहे. त्यामुळे ही संभाव्य स्थिती लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याचे आरोग्य सचिव, गृह सचिव यांच्याशीही चर्चा करणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी करताना हजारो मतदान केंद्रांवर सर्व सुविधा कशा पुरविता येतील याचा विचारही आयोगाचे पथक करणार आहे. पूर्वतयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी हे पथक राजकीय नेत्यांनाही भेटणार आहे.केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करा : भाजपपश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रचारमोहिमेच्या काळापासूनच या राज्यात केंद्रीय राखीव पोलीस दलांचे जवान तैनात करण्यात यावेत, अशी मागणी भाजपच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची नुकतीच भेट घेऊन केली होती. मात्र, भाजपचे हे आरोप तृणमूल काँग्रेसने फेटाळून लावले होते.
विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी निवडणूक आयोगाचे पथक प. बंगालमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 2:10 AM