नवी दिल्ली: बोर्डिंग पास, तिकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापल्यानं निवडणूक आयोगानं रेल्वे बोर्डचे संचालक आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव यांना पत्र लिहिलं आहे. या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. एअर इंडियाच्या बोर्डिंग पास आणि रेल्वे तिकिटांवर पंतप्रधान मोदींचा फोटो छापल्यानं आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी रेल्वेला नोटीस बजावली होती. मात्र या नोटिशीला उत्तर देण्यात न आल्यानं निवडणूक आयोगानं रेल्वे बोर्डचे संचालक आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिवांना पत्र लिहिलं. आचारसंहितेचं पालन करण्याचा सल्ला निवडणूक आयोगानं दोन्ही विभागांना दिला. एअर इंडियानं शुक्रवारी बोर्डिंग पासवर पंतप्रधान मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या फोटोंचा पुन्हा एकदा वापर केला. शुक्रवारी संध्याकाळी मदुराईहून एअर इंडियाच्या विमानानं उड्डाण केलेल्या एका प्रवाशानं बोर्डिंग पासचा एक फोटो ट्विट केला. त्यावर मोदी आणि रुपाणी यांचा फोटो होता. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाला आचारसंहितेच्या कथित उल्लंघनावरुन टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतर विमान कंपनीनं बोर्डिंग पास रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही मोदींचे फोटो असलेले बोर्डिंग पास वापरले जात आहेत. दुसऱ्या एका प्रकरणात, भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा भाग असलेल्या 'मैं भी चौकीदार' घोषणा लिहिलेला चहाचा कप रेल्वेत आढळून आला होता. त्याबद्दल निवडणूक आयोगानं रेल्वेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. एका प्रवाशानं या कपचा फोटो ट्विट केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.