- हरिश गुप्ता नवी दिल्ली : वादग्रस्त निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांना पद सोडण्यास सांगण्यात आल्याचा निरोप दिला गेल्याचे समजते. सरकारमधील अति उच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवासा यांना त्यांनी घटनात्मक पदाचा राजीनामा द्यावा, असे औपचारिकरीत्या सांगण्यात आले आहे. दहा मुख्य कंपन्यांच्या संचालक मंडळावर अशोक लवासा यांची पत्नी नोव्हेल लवासा यांची नियुक्ती झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर योग्य ती चौकशी करण्याची सरकारची इच्छा आहे. लवासा हे सरकारमध्ये संवेदनशील पदांवर कार्यरत होते तेव्हा त्यांच्या पत्नीला कंपन्यांच्या मंडळावर घेण्यात आले होते.ऑगस्ट २०१४ मध्ये अशोक लवासा यांना ऊर्जा सचिव हे महत्त्वाचे पद दिले गेल्यानंतर मोदी सरकारने त्यांना एकामागून एक महत्त्वाची पदे दिली. नंतर ते पर्यावरण सचिव होते, तर २०१६ मध्ये त्यांना अर्थ सचिवाची जबाबदारी दिली गेली. ऑक्टोबर २०१७ मध्ये सेवानिवृत्तीनंतर लवासा यांना त्यांच्या आतापर्यंतच्या सेवांची बक्षिसी जानेवारी २०१८ मध्ये निवडणूक आयुक्तपद देऊन दिली गेली.लवासा यांचे सरकारशी संबंध असेच मधुर राहिले असते, तर ते एप्रिल २०२१ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त बनले असते; परंतु त्यांच्या पत्नीचा संबंध असलेल्या हितसंबंधांचा संघर्ष आणि औचित्यभंगाचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर अशोक लवासा यांना हव्याशा पदावर कायम ठेवण्याची सरकारची इच्छा नाही.यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व इतर सहकाऱ्यांशी मतभेद व्यक्त करून खळबळ निर्माण केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या झालेल्या आरोपावरून लवासा यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी मतभेद व्यक्त केले होते.नोव्हेल लवासा या स्टेट बँक आॅफ इंडियातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि ल्युटेन्स दिल्लीत एक चित्रकार एवढीच त्यांची ओळख असताना कंपन्यांनी त्यांच्यात एवढा रस का दाखवला याचा तपशील सरकारला माहीत करून घ्यायचा आहे. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीची चौकशी करता येत नसल्यामुळे चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अशोक लवासा यांना पदाचा राजीनामा देण्याचा निरोप दिला गेला आहे.
निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांना राजीनामा देण्याचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 1:51 AM