नवी दिल्ली - लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची म्हणजेच लोकसभा निवडणुकांची अखेर आज घोषणा झाली. देशातील १८ व्या लोकसभा निवडणुकांसाठी आज मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती देत पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. यावेळी, शेरो-शायरीतून त्यांनी अनेकांना टोला लगावला, तर मतदारांना मतदानाला आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहनही केलं. यावेळी, राजकीय पक्षाच्या नेत्यांनाही निवडणूक आयुक्तांनी मोलाचा सल्ला दिला असून वैयक्तिक टीका टीपण्णी करण्यापासून स्वत:ला रोखलं पाहिजे, असे म्हणत शायराना अंदाज दाखवला. यावेळी, सभागृहातील पत्रकारांमध्येही हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.
देशातील लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. नुकतेच, निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्ञानेश कुमार व सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासमवेत लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर, आज राजीव कुमार यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, ही निवडणूक ७ टप्प्यात होत असून २८ मार्च रोजी पहिलं नोटीफिकेश जारी होणार आहे. तर, १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर, देशातील संपूर्ण लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.
निवडणूक आयुक्तांनी निवडणूक प्रकियेवर भाष्य करताना सर्वोतोपरी माहिती दिली. निष्पक्ष आणि स्वतंत्र निवडणुका होणार असून तब्बल ९७.८ कोटी मतदार या निवडणुकांसाठी मतदान करतील, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी, निवडणूक प्रकियेत असलेल्या आव्हानांवरही त्यांनी भाष्य केलं. तर, मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन करत, राजकीय पक्षांनाही शायरीतून टोला लगावला. राजकीय पक्षांनी वैयक्तिक टीका-टीपण्णीपासून दूर राहायला हवं, असा सल्ला राजीव कुमार यांनी दिला. यावेळी, त्यांनी, बशीर बद्र यांचा एक शेरही ऐकवला.
दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों.
अशी शायरी निवडणूक आयुक्तांनी केली, त्यावर सभागृहातील पत्रकारांना टाळ्या वाजवून दाद दिली. त्यानंतर, आजकाल राजकारणात दोस्ती आणि दुश्मनी दोन्ही लवकर लववकरच होत असल्याचं राजीव कुमार यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानावर सभागृहात हशा पिकल्याचं दिसून आलं. दरम्यान, महाराष्ट्र आणि बिहारमधील राजकारण गेल्या ५ वर्षात अशारितीनेच झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच, आयुक्तांनी कुठल्याही पक्षाचं नाव न घेता सर्वांनाच चिमटा काढला.
दरम्यान, राजकीय नेत्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर निवडणूक आयोगाचं लक्ष असणा आहे. त्यावरुन, अश्लाघ्य भाषेचा वापर करण्यात आला असेल तर त्या पोस्ट हटविण्यात येतील. तसेच, टीका टीपण्णी करताना मर्यादा ओलांडली किंवा चुकीच्या बातम्या, खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केल्यास आयोगाकडून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.