निवडणूक आयोगाची प्रियांका गांधींना नोटीस, पंतप्रधान मोदींसंदर्भात केलं होतं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 08:08 AM2023-10-27T08:08:07+5:302023-10-27T08:08:38+5:30
आयोगाने प्रियंका गांधी यांना 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.
काँग्रेस नेत्या तथा पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या एका दाव्यासंदर्भात, निवडणूक आयोगाने त्यांना गुरुवारी नोटीस बजावली असून उत्तर मागितले आहे. आयोगाने प्रियंका गांधी यांना 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे.
राजस्थानमधील दौसा येथे प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना, मोदी यांनी मंदिरात केलेल्या दानाचा लिफाफा फोडल्यानंतर त्यात केवळ 21 रुपये मिळाले, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर, भाजपने प्रियांका गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यासोबतच प्रियांका गांधी यांच्या भाषणाचा व्हिडिओदेखील जोडण्यात आला होता.
भाजपनं केली होती अशी तक्रार? -
यासंदर्भात बोलताना केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटले होते, "काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी 20 ऑक्टोबरला आपल्या भाषणादरम्यान एक वक्तव्य करत आचार संहितेचे उल्लंघन केले,'' असे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले आहे. तसेच, प्रियांका गांधी आचार संहितेपेक्षाही वर आहेत का? असा सवाल करत, आपण खोटे पसरवू शकत नाही आणि धार्मिक भावनेने प्रचार केला जाऊ शकत नाही, असेही मेघवाल यांनी म्हटले होते.
काय म्हणाल्या होत्या प्रियांका गांधी? -
प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या, ''आपण तर बघितलेच असेल, मी टीव्हीवर बघितले, माहीत नाही खरे की खोटे. कदाचित पंतप्रधान मोदी देवनारायणजींच्या मंदिरात गेले होते. त्यांनी तेथे लिफाफा टाकला. मी टीव्हीवर बघितले, 6 महिन्यांनंतर, पीएम मोदींनी दान केलेला लिफाफा फोडण्यात आला, तर त्यात 21 रुपये मिळाले." एवढेच नाही, तर "एक प्रकारे हेच सुरू आहे. देशात व्यासपीठावर उभे राहून कशा-कशा प्रकारचे लिफाफे आपल्याला दाखवले जात आहेत. जव्हा आपण ते लिफाफे उघडता तेव्हा निवडणूक संपलेली असते,'' असेही प्रियांका यांनी म्हटले होते.