लोकसभाध्यक्षपदासाठी ४८ वर्षांनी निवडणूक; ओम बिर्ला आणि के. सुरेश यांच्यात आज लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 06:17 AM2024-06-26T06:17:13+5:302024-06-26T06:18:11+5:30

लोकसभा अध्यक्षपदासाठी मंगळवारी सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकले नाही.

Election for Lok Sabha Speaker after 48 years Om Birla and Fight today between k Suresh | लोकसभाध्यक्षपदासाठी ४८ वर्षांनी निवडणूक; ओम बिर्ला आणि के. सुरेश यांच्यात आज लढत

लोकसभाध्यक्षपदासाठी ४८ वर्षांनी निवडणूक; ओम बिर्ला आणि के. सुरेश यांच्यात आज लढत

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदासाठी मंगळवारी सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे एनडीएचे उमेदवार आणि भाजप खासदार ओम बिर्ला यांची लढत काँग्रेसच्या कोडीकुन्नील सुरेश यांच्याशी बुधवारी होणार आहे. असे झाल्यास लोकसभेच्या इतिहासात फक्त चौथ्यांदाच मतदान होणार आहे. यापूर्वी लोकसभाध्यक्षपदासाठी १९५२, १९६७ आणि १९७६ अशा तीन प्रसंगी निवडणूक झाली आहे.

बिर्ला आणि सुरेश यांनी मंगळवारी अनुक्रमे एनडीए व इंडियाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले. बिर्ला यांना पाठिंबा देण्याच्या बदल्यात विरोधी पक्ष 'इंडिया' आघाडीला उपाध्यक्षपद हवे होते. पण, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही अट मान्य न केल्याने विरोधकांनी या निवडणुकीसाठी उमेदवार उतरविण्याचे ठरविले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या संसद भवनातील कार्यालयात काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि द्रमुकचे टी.आर. बालू यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची उपस्थिती होती. मात्र, दोन्ही बाजूंकडील नेते आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे तोडगा निघू शकला नाही. लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास नकार देत वेणुगोपाल आणि बालू हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयातून बाहेर पडले.

आकडे काय सांगतात? 
- सभागृहात भाजपसह एनडीएचे २९३ खासदार तर इंडिया
आघाडीकडे २३३ सदस्य आहेत.
- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधून राजीनामा दिल्याने सभागृहातील सदस्य संख्या ५४२ झाली आहे. किमान तीन अपक्ष सदस्यही विरोधी गटात असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस, भाजपचे व्हीप
लोकसभाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी उद्या सर्व खासदारांनी सभागृहात उपस्थित राहावे असा तीन ओळींचा व्हीप काँग्रेस पक्षाने मंगळवारी जारी केला आहे. भाजपनेही आपल्या सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीप्रसंगी उपस्थित राहावे, असा व्हीप काढला आहे.

उमेदवारावर चर्चा झाली नाही : तृणमूल काँग्रेस 
लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधी आघाडी 'इंडिया'चे संयुक्त उमेदवार के. सुरेश यांना उमेदवारी देण्यापूर्वी आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही, असे तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

जगनमोहन रेड्डी यांचा ओम बिर्ला यांना पाठिंबा
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी हे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओम बिर्ला यांना पाठिंबा देणार आहेत. लोकसभेत एनडीएची २९७ मते बिर्ला यांना मिळणार हे गृहीत होते. आता वायएसआर काँग्रेस पक्षाच्या खासदारांची मतेही ओम बिर्ला यांना मिळतील.

जिंकणे किंवा हरणे हा मुद्दा इथे महत्त्वाचा नाही. तर, परंपरेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. लोकसभा अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचा आणि उपाध्यक्ष विरोधकांचा असायला हवा. - के. सुरेश, इंडिया आघाडीचे उमेदवार

उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची परंपरा : राहुल गांधी
- काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, लोकसभेचे उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची परंपरा आहे. 
- जर एनडीए सरकारने या परंपरेचे पालन केले तर पूर्ण विरोधी पक्ष सभागृहात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारचे समर्थन करेल.
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना फोन केला होता आणि पुन्हा फोन करण्याबाबत बोलले होते. फोन आला नाही.
- पंतप्रधान विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा करतात. मात्र, काँग्रेस नेत्याचा अपमान होत आहे.

Web Title: Election for Lok Sabha Speaker after 48 years Om Birla and Fight today between k Suresh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.