पप्पू मत कहो ना... गुजरातमध्ये निवडणूक आयोगाची भाजपाला तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 10:34 AM2017-11-15T10:34:36+5:302017-11-15T12:08:50+5:30
भाजपाकडून निवडणुकीच्या जाहिरातींमध्ये 'पप्पू' नावाचा वापर केला जात असून, निवडणूक आयोगाने यावर आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाने भाजपाला पाठवलेल्या पत्रात, निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिराती, होर्डिंग, पोस्टर्सवर पप्पू नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करण्यावर आक्षेप घेतला आहे.
अहमदाबाद - विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गुजरातमध्ये प्रचाराच्या तोफा धडाधड असून भाजपाच्या एका गोष्टीवर निवडणूक आयोगाने मात्र आक्षेप नोंदवला आहे. भाजपाकडून निवडणुकीच्या जाहिरातींमध्ये 'पप्पू' नावाचा वापर केला जात असून, निवडणूक आयोगाने यावर आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाने भाजपाला पाठवलेल्या पत्रात, निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिराती, होर्डिंग, पोस्टर्सवर पप्पू नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करण्यावर आक्षेप घेतला आहे. आयोगाने भाजपाला प्रचारातून पप्पू नाव हटवण्यास सांगितलं आहे.
दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने, अशाप्रकारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधणं मर्यादेचं उल्लंघन असल्याचं सांगितलं आहे. निवडणूक आयोगाने भाजपाच्या प्रचार मोहिमेचं निरीक्षण केल्यानंतर म्हटलं आहे की, एका खास व्यक्तीकडे इशारा करत अपमान करण्याच्या हेतूने पप्पू नावाचा वापर केला जात आहे. भाजपाने मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या प्रचारात कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नसल्याने अशा प्रकारचा आदेश देणं योग्य नसल्याचं भाजपाचं म्हणणं आहे.
गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल हाती येणार आहेत. राज्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य सामना असेल असं म्हटलं जात आहे. गुजरातमध्ये एकूण 182 विधानसभा जागांसाठी निवडणूक आहे. बहुमतासाठी 92 जागांची गरज आहे. राज्यात गेल्या दोन दशकांपासून भाजपाचं सरकार आहे. राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्तावर लढवल्या होत्या. तिन्ही वेळा भाजपाने बहुमताने सरकार स्थापन केलं होतं. 2014 रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत.
पाटीदार नेता हार्दिक पटेलच्या सीडी प्रकरणामुळे सध्या गुजरातमध्ये राजकीय भूकंप आला आहे. हार्दिक पटेल ही सीडी भाजपानेच जारी केल्याचा आरोप केला आहे. याआधी हार्दिक पटेलची एका हॉटेलमध्ये जात असतानाची सीडी प्रसारमध्यामांनी जारी केली होती. या फुटेजमध्ये हार्दिक पटेल राहुल गांधींना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्याचा दावा करण्यात आला होता. आयबी आणि गुजरात पोलिसांनी काँग्रेस नेता थांबलेल्या सर्व हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत असा आरोप काँग्रेस नेता अशोक गहलोत यांनी केला होता. भाजपाने मात्र सर्व आरोप फेटाळले होते.