‘इलेक्शन किंग’ के. पद्मराजन लढत आहेत २०१वी निवडणूक, राहुल गांधींविरुद्धही अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 08:18 AM2019-04-05T08:18:17+5:302019-04-05T08:19:49+5:30

वायनाडमधूनही उमेदवारी : गिनिज बुकच्या विक्रमासाठी धडपड

'Election King' Padmarajan is contesting against the 201 V election, against Rahul Gandhi | ‘इलेक्शन किंग’ के. पद्मराजन लढत आहेत २०१वी निवडणूक, राहुल गांधींविरुद्धही अर्ज दाखल

‘इलेक्शन किंग’ के. पद्मराजन लढत आहेत २०१वी निवडणूक, राहुल गांधींविरुद्धही अर्ज दाखल

Next

सेलम (तामिळनाडू) : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करणारे के. पद्मराजन हे त्यांच्या आयुष्यातील २०१वी निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत एकही निवडणूक न जिंकूनही ते ‘इलेक्शन किंग’ म्हणून ओळखले जातात.
सर्वात अयशस्वी व सर्वात जास्त निवडणुका लढविणारा उमेदवार म्हणून आपली नोंद गिनिज बुकात होण्याकरिता ते आता नवा विक्रम रचू पाहात आहेत.के. पद्मराजन यांच्या अनोख्या कामगिरीची दखल लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्नेही घेतली आहे.

सामान्य माणूसही निवडणूक लढू शकतो हेच त्यांना आपल्या कृतीतून सिद्ध करायचे असते. वाहनांच्या टायरची विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. तामिळनाडूतील धर्मापुरी मतदारसंघातूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता ते वायनाडमध्ये दाखल झाले. सातत्याने निवडणुका लढविण्याच्या प्रयत्नांमुळे माझे नाव २००४ साली गिनिज बुकात नोंदविण्यात आले आहे. गिनिज बुकच्या वेबसाइटवरही माझे नाव २०१५ साली झळकले आहे. पण मी अजून विक्रम केलेला नाही. ते ध्येय साध्य करायचे आहे, असे ६० वर्षे वयाचे के. पद्मराजन सांगतात, तेव्हा हे ऐकणारे सारेच जण अचंबित होतात. त्यांनी १९८८ साली मेत्तूर विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढविली होती. नंतर १९९६ साली लोकसभा व विधानसभा निवडणुकांत वेगवेगळ््या आठ मतदारसंघांतून त्यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यानंतर निवडणूक आयोगाने एखाद्या उमेदवाराने एकाचवेळी दोन मतदारसंघांतूनच निवडणूक लढवावी असा नियम केला होता. पद्मराजन यांना आतापर्यंत सवाधिक ६७२३ मते २०११ साली मेत्तूर विधानसभा मतदारसंघात मिळाली होती. (वृत्तसंस्था)

आतापर्यंत ३० लाख खर्च
गेल्या ३० वर्षांत निवडणुकांवर त्यांनी ३० लाख रुपये खर्च केले आहेत. आंध्र प्रदेशमधील नांद्यालमधून दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविरोधात ते उभे होते. करुणानिधी, जयललिता, एस. एम. कृष्णा, बंगारप्पा, एच. डी. कुमारस्वामी आदींच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे धाडस पद्मराजन यांनी दाखविले आहे.

Web Title: 'Election King' Padmarajan is contesting against the 201 V election, against Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.