नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणूक 2019 च्या वेळापत्रकाला होणाऱ्या विलंबावर विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाला टीकेचे लक्ष्य केले होते. बुधवारी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी ईव्हीएम मशिन तपासणी अंतिम टप्प्यात आली असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाने देशातील सर्व राज्यांना ईव्हीएम-वीवीपीएटी मशिनबाबत योग्य ते निर्देश दिले आहेत. जवळपास 98 टक्के ईव्हीएम मशिन्सची तपासणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्राथमिक स्तरावर 98 टक्के ईव्हीएम मशिन्सशी तपासणी झाली आहे. ईव्हीएम आणि वीवीपीएटी मशिन्सच्या तपासणीसाठी 4 प्रक्रियेचा वापर करण्यात आला असल्याची निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जम्मू काश्मीर येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी राजकीय नेते, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत राजकीय पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक निकालांसाठी ईव्हीएम मशिनला जबाबदार धरले, यावर अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत राजकीय पक्ष ईव्हीएमचा वापर आरोप-प्रत्यारोपासाठी करत असल्याचं सांगितले.
या पत्रकार परिषदेत अरोडा यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी कर्नाटकसह अन्य 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. याठिकाणी वेगवेगळे निकाल लोकांना पाहायला मिळाले. निकाल आपल्या बाजूने लागला तर ईव्हीएम मशिन्स चांगल्या आहेत, अन्यथा वाईट आहे असा आरोप राजकीय पक्षांकडून केला जातो.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी सोमवारी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी विलंब होण्याबाबत निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला फायदा पोहचविण्यासाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यास विलंब केला जातो असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग पंतप्रधानांचे प्रचार दौरे संपण्याची वाट बघत आहे का असा प्रश्न करत नरेंद्र मोदी आपल्या राजकीय जाहीरातबाजीसाठी सरकारी संस्थांचा वापर करत असल्याचा आरोप अहमद पटेल यांनी केला