नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उमेदवारांचीही घोषणा होताना दिसून येत आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर, सपा, भाजप आणि काँग्रेसकडूनही उमेदवारांच्या नावांची यादी तयार होत आहे. काँग्रेसने उन्नाव बलात्कार पीडित मुलीच्या आईला उमेदवारी घोषित केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
प्रियंका गांधींनी काँग्रेसकडून महिलांना निवडणुकीत स्थान देण्यात येत असल्याचं म्हटलंय. तसेच, या महिलांमध्ये एक नाव विशेष आहे, ते म्हणजे 2017 च्या उन्नाव बलात्कार पीडित मुलीची आई आशा सिंह यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तसेच, काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही काँग्रेसने तिकीट दिले आहेत. दरम्यान, 2017 उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सेंगर यास दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
प्रियंका गांधी आमच्या कुटुंबाला मदत करत आहेत. आम्हाला त्यांच्या पीएकडूनच निवडणुकांसदर्भात विचारणा झाली, त्यावेळी आम्ही निवडणूक लढविण्यास होकार दिला, असे बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितले. त्यानंतर, आशा सिंह यांनी ट्विटरवरुनही माहिती दिली असून माझ्या संघर्षात माझ्यासोबत असलेल्या काँग्रेस पक्षाचे मी आभार मानते, असेही आशा सिंह यांनी म्हटले आहे. तर, बलात्कार पीडित मुलीनेही आपण लढाई लढत असल्याचं म्हटलं. तसेच, माझी आई अशिक्षित असल्याने ती अधिक बोलू शकत नाही, असेही सांगितले.