हिमाचलमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड ठरतेय काँग्रेससाठी डोकेदुखी, अनेक दावेदार, कुणाला संधी मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 06:12 PM2022-12-09T18:12:48+5:302022-12-09T18:13:19+5:30
Himachal Pradesh Congress: हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे आव्हान मोडीत काढत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र या विजयानंतर मुख्यमंत्र्यांची निवड करणे काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे.
सिमला - हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाचे आव्हान मोडीत काढत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. मात्र या विजयानंतर मुख्यमंत्र्यांची निवड करणे काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. मुख्यमंत्रिपद कुणाला द्यावे यावरून पक्षामध्ये तणाव असल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, पार्टी हायकमांडने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि हरियाणामधील नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांना निरीक्षक म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी मदत करण्याची आणि पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत मिळून या प्रश्नावर तोडगा काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये आज सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा होऊ शकते. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदार असल्याने प्रत्येक नेत्याचे समर्थक हे रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसचे निरीक्षक पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी घेराव घातला. तसेच घोषणाबाजी केली. खूप प्रयत्नांनंतर या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आले.
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने ६८ पैकी ४० जागा जिंकून भाजपाला मात दिली होती. त्यानंतर काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी अनेक नावे समोर येत आहेत. त्यामध्ये हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. त्यांच्यापाठोपाठ हिमाचल काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंह सुक्खू आणि मुकेश अग्निहोत्री यांचीही नावं शर्यतीत आहेत. तसेच पक्षाचे हिमाचलमधील इतर काही नेतेही मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक आहेत.