काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक निष्पक्ष व पारदर्शी होणार, उद्याच अधिसूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 09:03 AM2022-09-21T09:03:57+5:302022-09-21T09:04:22+5:30
सोनिया गांधी यांना भेटले वेणुगोपाल
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू असताना पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली व निवडणूक निष्पक्ष व पारदर्शी होणार असून, त्यात कोणीही उभा राहू शकतो, असे सांगितले.
सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर वेणुगोपाल यांनी सांगितले की, ही एक नियमित भेट होती व संघटनेशी संबंधित काही प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा झाली. वेणुगोपाल मागील काही दिवसांपासून ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होते व मंगळवारी त्यांनी येथील १० जनपथवर सोनिया गांधी यांची भेट घेतली. ज्येष्ठ नेते राहुल गांधी उमेदवारी अर्ज दाखल करतील का, असे विचारले असता वेणुगोपाल म्हणाले की, याबाबतचा निर्णय राहुल गांधी घेतील. त्यांना याबाबत मला काहीही सांगितलेले नाही. शशी थरूर यांच्या निवडणूक लढण्याच्या शक्यतेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, फक्त थरूरच नव्हे तर कोणीही निवडणूक लढवू शकतो.
अनेक राज्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याची मागणी करणारा प्रस्ताव पारित केला आहे. त्याबाबत विचारले असता, वेणुगोपाल म्हणाले की, त्यात चुकीचे काय आहे? यात्रेमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा व प्रेम मिळत आहे. राहुल गांधी हे दृढ संकल्प असणारे व्यक्ती आहेत. कार्यकर्त्यांना त्यांचे नेतृत्व हवे आहे. काॅंग्रेसच्या सर्वोच्च पदांसाठी दोन दशकांनंतर निवडणुकीत लढत होण्याची शक्यता वाढली आहे.
निवडणुकीची अधिसूचना उद्या जारी होणार
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीची अधिसूचना २२ सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर हाेणार आहे.