जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये शक्य तितक्या लवकर विधानसभा निवडणुका घेण्यास आम्ही बांधील आहोत. ३० सप्टेंबरच्या आत निवडणूक घेण्यासंदर्भात आयोग पावले टाकत आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी शुक्रवारी सांगितले. देशांतर्गत किंवा बाह्यशक्तींना निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करू देणार नाही, असे ते म्हणाले. असे झाल्यास महाराष्ट्राच्या आधी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक हाेईल.
आयोगाच्या शिष्टमंडळाने जम्मू-काश्मीरचा दोन दिवसांचा दौरा केला. या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक घेण्याच्या दृष्टीने किती अनुकूल वातावरण आहे, पूर्वतयारीसाठी किती वेळ लागेल या सर्व गोष्टींचा निवडणूक आयोगाने आढावा घेतला. त्यासाठी विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली. त्यानंतर राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.