देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे केंद्र सरकारने राज्यांना आवश्यक पाऊले उचलण्याचे आदेश दिले आहेत. त्याला अनुसरून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातसह (काही शहरे) महाराष्ट्राने रात्रीचा कर्फ्यू जाहीर केला आहे. देशात सध्या ओमायक्रॉनबरोबरच पाच राज्यांच्या निवडणुकांचे वारे सुरु आहेत. उत्तर प्रदेशची निवडणूक पुढे ढकलावी, असा आवाहनवजा सल्ला अलाहबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. यावर आता भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची प्रतिक्रिया आली आहे.
निवडणूक आयोगाने परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे. आता या निवडणूक पुढे ढकलण्यावरून राजकारण सुरु झाले आहे. स्वामी यांनी उत्तर प्रदेशची निवडणूक पुढील वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलले जाणार असल्याचे वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नका, जे थेट करता येणार नव्हते ते अप्रत्यक्षरित्या केले जाणार आहे, असे ट्विट स्वामी यांनी केल्याने देशाच्या राजकारणात चर्चांना उत आला आहे.
निवडणूक पुढे ढकलल्यास भाजपला फायदा होईल का, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींच्या या ट्विटमधूनही अनेक अर्थ काढले जात आहेत. कारण काही काळापासून ते आपल्याच सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. अलीकडच्या काळात ते मोदी सरकारवर फटकेबाजीची एकही संधी सोडत नाही. उच्च न्यायालयाच्या आवाहनावर समाजवादी पक्ष संतापला आहे.
यूपीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात की नाही याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र म्हणाले की, पुढील आठवड्यात आम्ही यूपीमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेऊ, त्यानंतरच योग्य निर्णय घेऊ. निवडणूक आयोगाचे पथक उत्तर प्रदेशात येत आहे. 28 ते 29 डिसेंबर दरम्यान आयोगाची टीम उत्तर प्रदेशात असेल. यादरम्यान, यूपीच्या सर्व जिल्ह्यांतील जिल्हा दंडाधिकारी, एसपी आणि एसएसपींना यूपीची राजधानी लखनऊ येथे बोलावण्यात आले आहे.