लखनऊ : भाजपाचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने पुन्हा नोटिस पाठविली आहे. 72 तासांच्या बंदीनंतरही योगी आदित्यनाथांनी वादग्रस्त विधाने सुरुच ठेवली आहेत. महाआघाडीच्या एका उमेदवाराला बाबर की औलाद असे म्हटल्याने आयोगाने त्यांना 24 तासांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
यावर योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभांचे मंच काही भजने गायला असतात का , असा सवाल केला आहे. तसेच हे मंच विरोधकांवर आरोप करण्यासाठीच असतात, असे सांगत त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. विरोधकांना उखडून फेकण्यासाठी आणि त्यांना लक्ष्य करण्यासाठी भाषणे केली जातात. हे आमचे कामच आहे. जर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस निवडणुक काळात शिव्या देत असेत तर आम्हीही वाईट वाटून घेणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच पंतप्रधान बनण्यासाठी 272 जागा जिंकण्याची आवश्यकता असते. यामुळे हे विरोधक केवळ 37-38 जागांवर लढत असून पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पाहत आहेत. अखिलेश यादव जेव्हा मायावतींना भेटायला गेले तेव्हा त्यांना चप्पल बाहेर काढण्यास सांगितले गेले. तसेच त्यांना मायावतींपेक्षा छोटी खुर्ची देण्यात आली. ही त्यांची जागा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
संभलमध्ये एका सभेवेळी आदित्यनाथ यांनी समाजवादी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला उद्देशून बाबर ची औलाद म्हटले होते. यापूर्वी निवडणूक आयोगाने आदित्यनाथांना 72 तासांची बंदी घातली होती. त्यांनी एका भाषणावेळी मुस्लिम लीगच्या झेंड्यांना व्हायरस म्हटले होते. तसेच भारतीय सैन्याला मोदींची सेना म्हटले होते.